Mumbai Vile Parle High Rise Building Fire : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथे मंगळवारी रात्री एका ११ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागलेल्या भीषण आगीत २३ वर्षीय तरुणी आणि अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आगीच्या वेळी मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या अंकिता छेत्रीने त्याला आपल्या मिठीत घेत बाथरूममध्ये नेले. मात्र, धुरामुळे गुदमरून दोघांचाही मृत्यू झाला. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
मुलाला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा केली नाही
मंगळवारी रात्री शांता भवन इमारतीतील ११ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. त्यावेळी अडीच वर्षांचा अबीर बाटाविया बेडरूममध्ये झोपला होता. आग आणि धूर वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच २३ वर्षीय अंकिता छेत्री मुलाला वाचवण्यासाठी बेडरूमच्या दिशेने धावली. तिने अबीरला उचलले आणि धुरापासून बचाव होईल या आशेने त्याला जोडलेल्या बाथरूममध्ये नेले. मात्र, बाथरूममध्येही धूर भरल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. बचाव पथकाला अबीर अंकिताच्या मिठीत आढळला.
आई-वडील धक्क्यात
अबीर हा त्याच्या आई-वडिलांचा सर्वात लहान मुलगा होता. त्याचे वडील सिद्धार्थ आणि आई जैनी बाटाविया या दुर्घटनेनंतर प्रचंड धक्क्यात आहेत. कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन अंत्यविधी आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, अंकिताचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्यामुळे तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात अडचणी निर्माण झाल्या. अंकिता मूळची पश्चिम बंगालमधील सिलीगुडीची होती आणि गेल्या काही महिन्यांपासून ती बाटाविया कुटुंबाबरोबर काम करत होती.
रात्री पावणे दहाच्या सुमारास आग
शांता भवन ही बेसमेंट आणि तळमजल्यासह एकूण ११ मजली निवासी इमारत आहे. २०२० मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. अग्निशमन दलाच्या तपासानुसार, रात्री सुमारे पावणे दहा वाजता हॉलमध्ये आग लागली. एसी युनिटजवळील विद्युत बिघाड किंवा अंकिता वापरत असलेल्या इस्त्रीमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट केले जाईल, अशी माहिती मिळत आहे.
आजोबांना मुलापर्यंत पोहोचता आले नाही
आग लागल्यानंतर हिरेन बाटाविया यांनी अबीर आणि अंकिता अडकलेल्या बेडरूमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचंड उष्णता आणि धुरामुळे त्यांना पुढे जाता आले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, बेडरूमची खिडकी उघडी असती तर दोघांचा जीव वाचण्याची शक्यता होती.
धुरामुळे इतर रहिवाशांमध्येही घबराट
आग आणि धूर संपूर्ण इमारतीत पसरल्यानंतर अनेक रहिवासी सुरक्षिततेसाठी टेरेसवर गेले. काही रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जिन्याच्या मार्गाने खाली आणले. इमारतीत अनेक ज्येष्ठ नागरिक राहत असल्याने बचावकार्य अधिक कठीण ठरले. एका ज्येष्ठ रहिवाशाला व्हीलचेअरवरून खाली आणावे लागले. या बचावकार्यात इमारतीचा वॉचमन शिवम द्विवेदी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी मनोज सोनावणे यांनाही किरकोळ दुखापत झाली.
अग्निशमन यंत्रणा होती, पण वापराची माहिती नव्हती
इमारतीत स्प्रिंकलर्स आणि अग्निशामक यंत्रांसह अग्निसुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती. मात्र ही यंत्रणा कशी वापरायची याची माहिती फार कमी रहिवाशांना असल्याचे समोर आले.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितले की, इमारतीतील केवळ दोन जणांना पंप चालवता येत होता आणि ते दोघेही त्या वेळी वरच्या मजल्यावर होते. त्यामुळे अग्निशमन पंपाचा योग्य वेळी वापर होऊ शकला नाही. या घटनेतून अग्निसुरक्षा यंत्रणा बसवणे पुरेसे नसून, ती आपत्कालीन परिस्थितीत कशी वापरायची याचे रहिवाशांना नियमित प्रशिक्षण देणे किती महत्त्वाचे आहे, हे समजते.
