मुंबई : क्षणभराची हलगर्जी एका कुटुंबासाठी काळरात्र ठरली. कपड्यांना इस्त्री करून बाहेर पडताना उपकरणाचा वीजपुरवठा बंद करण्यास विसरल्याने विलेपार्ले येथील चर्च रोडवरील ‘शांता भवन’ या बहुमजली इमारतीत मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आगीने वेढलेल्या बाळाला कुशीत घेऊन घरकाम करणाऱ्या महिलेने स्नानगृहात धाव घेतली. मात्र, गुदमरून दोघांचाही मृत्यू झाला. त्या दुर्घटनेत अन्य चारजण जखमी झाले आहेत. अबीर (वय अडीच वर्षे), अंकिता (२३) अशी मृतांची नावे आहेत.

इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील सदनिकेतील शयनगृहात घरकाम करणारी महिला कपड्यांना इस्त्री करीत होती. काम आटोपल्यानंतर इस्त्रीचा वीजपुरवठा बंद करण्यास अंकिता विसरली व ती तेथून बाहेर पडली. बऱ्याच वेळानंतर त्याबाबत कुटुंबातील कोणाच्याही लक्षात आले नाही. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीच्या तीव्र झळा त्या ठिकाणी खेळणारा अडीच वर्षांच्या अबीरभोवती वेढल्या गेल्या. ते पाहून भेदरलेल्या अंकिताने अबीरला उचलून स्नानगृहाचा आश्रय घेतला. मात्र, आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने घरातील इतर सदस्यांना बाहेर पडता आले नाही. त्यातील एका सदस्याने घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरू केले.

– आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री साडेदहाच्या सुमारास आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्रमांक. २) घोषित केले. त्यानंतर शेजारच्या घरातील सदनिका क्र.११०२ मधील सदस्यांनाही घराबाहेर पडत सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. मात्र, घाईत त्यांनी घराचा दरवाजा बंद न केल्याने आगीच्या ज्वाळा ११०२च्या सदनिकेपर्यंत पोहोचल्या. त्यात ११०२ सदनिकाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

– एकाच वेळी दोन्ही घरातील आग नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांसमोर होते. आगीची तीव्रता अधिक असल्याने काहीजण अकराव्या मजल्यावर अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. त्यात पार्थ (३२), हिरेन (६४), यशस्वी (३३) व अभिषेक आदी जखमी झाले. त्यांना नजीकच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

– स्नानगृहात आश्रय घेतलेल्या महिलेला व बाळालाही बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, श्वास गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

-आग चार हजार चौरस फूट जागेत पसरल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. विद्युत यंत्रणा, विजेच्या तारा, घरगुती सामान, वातानुकूलित यंत्रणा आदी जळून खाक झाले. अथक प्रयत्नानंतर रात्री एकच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.