मुंबई: राज्यात लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. मुंबईत सुमारे पाच लाख तर राज्यात दहा लाख मतदारांच्या नावांत विसंगती असल्याचा दावा करतानाच शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने मतदारांसोबत खेळ मांडला असल्याची टीका केली.
शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील त्रुटींचे पुरावे असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमधील आकडेवारीतील तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मतदारांची नावे नेमकी कशी गायब झाली, नोंदणी प्रक्रियेत एवढ्या मोठ्या त्रुटी कशा राहिल्या आणि या विसंगतींसाठी जबाबदार कोण, असे सवाल करत मतदार यादीतील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करून सर्व विसंगती दूर कराव्यात आणि मतदारांचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
वरळीत २४ हजार बोगस मतदार
वरळी मतदारसंघात २४ हजार बोगस मतदार आढळल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. दहा बाय दहाच्या खोलीत हजारो मतदारांची नावे असल्याचे चित्र समोर आल्याचा दावाही त्यांनी केला. महापालिका निवडणुकीपूर्वी तब्बल १७ लाख लोकांची यादी अधिकाऱ्यांना दिली होती, असे सांगत त्यांनी मतदार यादीतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माहीममध्ये सुमारे ९०० मतदारांचे मॅपिंग झाले नसल्याने त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. काही जिवंत व्यक्तींना मतदार यादीत मृत दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. एवढी माहिती प्रशासनाला दिल्यानंतरही मतदार यादीत इतका मोठा घोळ झालाच कसा, असा सवाल त्यांनी केला.
भिवंडीतील आकडेवारीचा दाखला
भिवंडी मतदारसंघातील आकडेवारीकडे लक्ष वेधताना आदित्य ठाकरे यांनी २०२४ मध्ये ३ लाख ७३ हजार ६५९ मतदार असल्याचे आणि त्यापैकी १ लाख ९१ हजार ६९१ जणांनी मतदान केल्याचे सांगितले, मात्र एसआयआर प्रक्रियेनंतरच्या आकडेवारीत केवळ १ लाख ९१ हजार ६४३ मतदारांचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. या आकड्यांतील तफावत नेमकी कशामुळे निर्माण झाली, असा सवाल त्यांनी केला.
