मुंबई : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यामध्ये नाव नसलेल्या नागरिकांसाठी चार दिवस विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन केले आहे. मतदारांच्या सुलभतेसाठी मुंबईत १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सर्व विधानसभा मतदारसंघातील पदनिर्देशित ठिकाणी विशेष नोंदणी शिबीर भरविण्यात येणार आहे. मात्र १९ आणि २० सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असल्यामुळे या शिबिराचा मुंबईकरांना खरोखर लाभ होणार का याबाबत शंका आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार यादीसाठी विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ३१ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. तथापि, प्रारुप यादीत नाव नसल्यास किंवा नोंदीबाबत आक्षेप असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच मतदारांच्या सुलभतेसाठी १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदार संघातील पदनिर्देशित ठिकाणी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र यापैकी १९ आणि २० सप्टेंबर रोजी गणेशोत्सव आहे. तसेच १९ सप्टेंबरला गौरी विसर्जन आहे. त्यातच अनेक मुंबईकर गणेशोत्सवासाठी गावी गेले आहेत. त्यामुळे या शिबीराचा लाभ मुंबईकरांना होणार का याबाबत शंका आहे.

मुंबईतील नवमतदार, तसेच पात्र असूनही मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांची नाव नोंदणी करणे, मतदार यादीतील अस्तित्वात असलेल्या नोंदीत सुधारणा करणे, तसेच यादीतील नावे वगळणे आदी बाबींवर या शिबिरात कार्यवाही केली जाईल. मुंबईतील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

१ ऑक्टोबर २०२६ किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव अंतर्भूत करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. दरम्यान, नवमतदार नोंदणी किंवा प्रारुप मतदार यादीत नाव वगळले गेले असल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज (फॉर्म) क्रमांक-६, तपशीलातील दुरुस्ती, अपंगत्वाची नोंद किंवा स्थलांतरासाठी नमुना अर्ज क्रमांक -८, तसेच मतदार यादीत नाव वगळण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ उपलब्ध आहेत. हे नमुना अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) प्राप्त करता येतील. तसेच, ऑनलाईन अर्जासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा किंवा ECINET या मोबाइल ॲपचा वापर करावा, असे आवाहन अश्विनी भिडे यांनी केले आहे.