मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरात २४ तासांसाठी खंडित करण्यात आलेला पाणी पुरवठा मंगळवारी रात्रीपर्यंत सुरळीत झाला नव्हता. उपनगरातील अनेक भागात मंगळवारचा संपूर्ण दिवस पाण्याशिवाय काढावा लागला. सायंकाळी सहानंतर पाणी पुरवठा सुरू होईल असे सांगण्यात आलेले असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रविवारनंतर पाणीच आले नाही. पश्चिम उपनगरातील अनेक भागात बुधवारी सकाळी देखील पाणी आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे  ३० जानेवारी  सकाळी १०:०० पासून ते  ३१ जानेवारी रोजी सकाळी १०:०० पर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रात काही तातडीची कामे हाती घेण्यात आली होती. या कामामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात २४ तास पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र दुरुस्तीची कामे लांबल्यामुळे आणखी आठ तास पाणी पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता.

हेही वाचा >>> वांद्रय़ातील बांधकामाशी परब यांचा संबंध नाही; शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घेरावानंतर ‘म्हाडा’चा निर्वाळा

मंगळवारी संध्याकाळी टप्प्याटप्प्याने मुंबईतील सर्व ठिकाणचा पाणी पुरवठा सुरू झाल्याचा दावा पालिकेने केला होता. मात्र उपनगरात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाणी मिळाले नाही. काही विभागांना थेट ४८ तासांनी बुधवारी पाणी पुरवठा झाला पण ते कमी दाबाने आल्यामुळे कमी मिळाले. काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा झाला.

हेही वाचा >>> वसई-विरारची तहान मार्चपासून भागणार, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार

गोराईसारख्या भागात रोज सकाळी ११ वाजल्यानंतर पाणी पुरवठा होतो तेथे मंगळवारी रात्री पाणी आलेच नाही. याच प्रमाणे अंधेरी, ओशिवरा, मालाड पश्चिम एव्हरशाईन नगर, मार्वे रोड,  विक्रोळी पश्चिम गांधीनगर, दहिसर पूर्व आनंद नगर, कांदिवली चारकोप सेक्टर ४, कुर्ला पश्चिम तकीया वॉर्ड, मालाड पूर्व इंदिरा नगर, भांडुप या सर्व भागात रात्री उशिरापर्यंत पाणी आले नवहते. नागरिकांनी साठवून ठेवलेले पाणीही संपले होते. अंधेरी पूर्व मध्ये पाणी सायंकाळी केवळ दहा मिनिटे आले त्यामुळे रहिवाशांचा संताप अनावर झाला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai water 48 hours eastern and western suburbs without water supply mumbai print news ysh
First published on: 01-02-2023 at 13:24 IST