मुंबई : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत चालला असून सातही धरणात मिळून सध्या ३७.७० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त असला तरी पुढचे दोन ते अडीच महिने तो पुरवावा लागणार आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणातील पाणीसाठा ३७.७० टक्क्यांवर आला आहे. या सातही धरणातून दररोज ४००० दशलक्ष लीटर पाणी मुंबईकरांना दिले जाते. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलै अखेरीसपर्यंत पुरेल असे नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहे.
सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणात मिळून ५ लाख ४५ हजार ६८० दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा जास्त असला तरी मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी टंचाई भेडसावते आहे. तसेच उन्हाचा तापही वाढू लागला असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे हा पाणीसाठा येत्या काही दिवसात आणखी खालावणार आहे.
प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य
गेल्याच आठवड्यात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाणी गळती व दूषित पाणी याबाबतच्या वाढत्या तक्रारींबाबत आढावा बैठक घेतली होती. तेव्हा पाणी गळतीच्या तक्रारी युद्धपातळीवर सोडवण्याचे आदेश दिले होते. तसेच पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनीही गेल्या आठवड्यात सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी पाणी पुरवठ्याचे नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. महापौर रितू तावडे यांनीही पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पर्यायी स्रोत व उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
नवीन प्रकल्पांना अद्याप चार पाच वर्षांची प्रतीक्षा …
मुंबईची लोकसंख्या गेल्या दहा पंधरा वर्षात झपाट्याने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पाणीसाठा वाढलेला नाही. मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधलेले नाही. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकाने काही वर्षांपूर्वी नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई पालिकेने गारगाई,पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. त्यापैकी गारगाई धरण प्रकल्पाच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजूरी दिली. तर मनोरी येथील निःक्षारीकरण प्रकल्पासाठी कार्यादेश देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या चार पाच वर्षांनी मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात सुमारे ६०० दशलक्षलीटर पाण्याची वाढ होणार आहे.
कोणत्या धरणात किती पाणी
उर्ध्व वैतरणा ……..४०.३५ टक्के
मोडकसागर ………३४.५५ टक्के
तानसा ……….३१.९७ टक्के
मध्य वैतरणा ……..३९.९६ टक्के
भातसा ………….३७.१३ टक्के
विहार ………….५८ टक्के
तुळशी ……….४३.६७ टक्के
गेल्या दोन वर्षातील पाणीसाठा
५ एप्रिल २०२६ ………५,४५,६८० दशलक्षलीटर …………३७.७० टक्के
५ एप्रिल २०२५ ……….४,९१,४३९ दशलक्षलीटर ………..३३.९५ टक्के
५ एप्रिल २०२४ ……….४,१३,८२८ दशलक्षलीटर …………२८.५९ टक्के
