मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा चिंताजनक आहे. सध्या असलेले पाणी हे पुढील वर्षापर्यंत पुरणार नाही. त्यामुळे एप्रिल – मे २०२७ पासून मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेले पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून तीन चार वर्षांचा कालावधी लागणार असून तोपर्यंत मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
एल निनोचा प्रभाव असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांमध्ये मिळून ऑक्टोबरच्या सुरुवातीला ९६ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सात जलाशयांमध्ये सुमारे १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्यक असते. सप्टेंबर अखेरील सर्व जलाशये १०० टक्के भरलेली असली तर वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो असे महापालिकेचे आजवरचे गणित आहे. यंदा पाणीसाठा आधीच कमी होता. त्यातच गेल्या काही वर्षांपासून धरणे १०० टक्के भरली तरी पाणीसाठा पुरत नाही. त्यातच यंदा अल निनोचा प्रभाव असल्यामुळे राज्य सरकारने ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध राहील याची खबरदारी घेण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यामुळे मुंबईत यंदा १० टक्के पाणी कपात लागू आहे.
पाण्याची वाढती मागणी
– मुंबईची पिण्याच्या पाण्याची मागणी सध्या ४६०० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकी असून उपलब्ध पाणीपुरवठा ४१०० दशलक्ष लिटर इतका आहे. त्यामुळे सध्या ६०० दशलक्ष लिटरची तूट आहे. तर २०४१ मध्ये प्रतिदिन ६४२४ दशलक्ष लिटर इतकी पाण्याची मागणी असेल.
– पालिकेने गारगाई धरण, मनोरी आणि वर्सोवा येथे निक्षारीकरण प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले असून हे प्रकल्प २०३० पर्यंत पूण होतील व त्यामुळे प्रतिदिन केवळ ५१४० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. पाण्याची तेव्हाची मागणी ५३२० दशलक्ष लिटर इतकी असेल. त्यामुळे तीनही प्रकल्प पूर्ण झाले तरी पाण्याची तूट राहणारच आहे.
– दुसऱ्या बाजूला मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून सध्या मुंबईत तीन हजाराच्या आसपास बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे हे गारगाई, वर्सोवा, मनोरी हे तीनही प्रकल्प पूर्ण झाले तरी पाण्याची मागणी वाढणार आहे.
गारगाई धरण प्रकल्पाला वेग
मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या तरी आपण फक्त पावसावर आणि धरणाच्या साठवण क्षमतेवर अवलंबून आहोत. मात्र हवामान बदलामुळे एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तर पाण्याचा अन्य स्रोत उपलब्ध नाही.
मुंबईच्या पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गारगाई धरण प्रकल्पाला वेग दिला जात आहे. गेल्या दोन दशकांपासून रखडलेला हा प्रकल्प मे २०२९ मध्ये पूर्ण करून त्यावर्षी धरणात पाणी साठेल असे नियोजन केले जात आहे.
