मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठ्यात गेल्या दोन – तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणीसाठा खालावून ६.७५ टक्क्यांवर पोहोचला होता. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गुरुवारी धरणातील पाणीसाठा ८.१२ टक्के झाला होता. मात्र सात धरणांपैकी पाच मोठ्या धरणांत अद्याप पावसाचा जोर नाही. त्यामुळे पाणीसाठा वाढू लागला असला, तरी पाणी टंचाईची चिंता कायमच आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांत गुरुवारी ८.१२ टक्के पाणीसाठा जमा झाला. यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली होती. जून महिना संपत आला तरी पावसाला सुरुवात झाली नव्हती.
त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी झाला. २९ जूनला पाणीसाठा ६.७५ टक्क्यांवर आला होता. मात्र ३० जूनपासून पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून पाणीसाठा वाढू लागला आहे. गुरुवारी २ जुलैला पाणीसाठा ८.१२ टक्के झाला आहे. यंदा पावसाळा लांबल्याने उपलब्ध पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे.
त्यामुळे पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुंबईत आधीच १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही १७ जून २०२६ पासून मर्यादा घालण्यात आल्या आहेत. बांधकामांना व जलतरण तलावांना दिलेल्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
तसेच औद्योगिक व व्यापारी, तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नाही, तर पाणी कपात वाढवावी लागण्याची शक्यता होती. परंतु, जून अखेरीस पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणी कपात वाढवण्याचा निर्णय लांबणीवर पडला. त्यामुळे सध्यातरी जुलै महिन्यात किती पाऊस पडतो यावर पालिका प्रशासनाची भिस्त आहे.
मुंबई महापालिकेने राज्य सराकारच्या मालकीच्या उर्ध्व वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष लिटर आणि भातसा धरणातून १ लाख ४० हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्यातील पाण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने राखीव साठ्यातील पाण्याच्या वापरासाठी परवानगीही दिली आहे. उर्ध्व वैतरणा धरणातील पाणीसाठा शून्यावर आल्यामुळे राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या असलेला पाणीसाठा, राखीव साठा आणि पाणी कपात हे गृहित धरून १७ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन आहे
पाणीसाठा वाढला, पण मुंबईतील जलाशयात
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या शहरात खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी या दोन जलाशयातील पाणीसाठ्यात भरपूर वाढ झाली. मात्र या दोन्ही तलावांची धारण क्षमता कमी आहे. परंतु, उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या मोठ्या धरणांत मात्र दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अद्याप पाण्याची चिंता कायम आहे.
कोणत्या धरणात किती पाणी
उर्ध्व वैतरणा – ०००
मोडकसागर – २२.३५ टक्के
तानसा – ३.६० टक्के
मध्य वैतरणा – १२.३८ टक्के
भातसा – ५.७२ टक्के
विहार – ५७.१८ टक्के
तुळशी – ३३.९६ टक्के
एकूण – ८.१२ टक्के
