मुंबई : मुंबईकरांना उत्तमोत्तम नागरी सुविधा देण्याचे कर्त्यव्य असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील कुर्ला, भांडुप, घाटकोपर, मानखुर्द, चेंबूर, वडाळा, गोरेगाव, दहिसर येथील अनेक परिसरात वर्षानुवर्षे नागरिकांचा पुरेशा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. वारंवार प्रशासनाकडे गाऱ्हाणे मांडूनही नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. तसेच, जवळपास ८० कोटींचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महापालिकेला पाण्यासारखी मूलभूत गरज पुरविण्यात यश येत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. जलवाहिन्यांची गळती, अनधिकृत जलजोडण्या आणि नियोजनाच्या अभावामुळे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याने मुंबईतील अनेक भागांमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहेत. जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही पाणीपुरवठ्याच्या सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा अद्याप झालेली नाही.

वर्षानुवर्ष या भागात पाणीच नाही

चिताकम्पमधील सेक्टर डी, महात्मा फुले नगर, चेंबूरमधील आनंद नगर, पत्राचाळ, वडाळ्यातील संगम नगर, शांती नगर, या भागांमध्ये नागरिकांना एक दशकाहून अधिक काळ लोटला तरीही पाणी मिळू शकलेले नाही. माफियांना पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. कुर्ल्यातील डोंगराळ भागात १७-१८ वर्षांपासून पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुर्ला येथील कुरेशी नगरात सुमारे ४० वर्षांपासून महापालिकेकडून पाणी दिले जात नसल्याचा धक्कादायक दावा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. वांद्रे येथील लाल मिट्टी, शास्त्री नगर, आरेतील बहुतांश वस्त्या, आदिवासी पाडे पाण्यापासून वंचित आहेत. शहर भागातील काही ठिकाणीही सारखीच स्थिती असल्याचे समजते.

शेकडो मोर्चे, आंदोलने आणि लेखी निवेदने

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आतापर्यंत शेकडो वेळा मोर्चे, लेखी निवेदने, आंदोलने केली आहेत. मात्र, प्रशासकडून पुरेशा पाणीपुरवठ्याबाबाबत ठोस उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. दरम्यान, या संदर्भात महापालिकेच्या जलअभियंता विभागातील अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, शहर भागातील मलबार हिल हा परिसर उंचवट्यावर आहे. मात्र, त्या ठिकाणी पुरेसा व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्याउलट सामान्य व कष्टकऱ्यांच्या डोंगराळ भागात पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही, असा आरोप घाटकोपर येथील नागरिकांनी केला. पायाभूत सुविधा, मोठमोठे प्रकल्प राबविण्यावर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, देशाच्या आर्थिक राजधानीतील हजारो नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागणे हे प्रशासनाचे अपयश आहे.

महानगरपालिका थेट पाणी देण्यास नकार देत नाही. मात्र, नागरिकांना बहिष्कृत करणाऱ्या अटी आणि नियम लावते. त्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही. बहुतांश भागांमध्ये अतिरिक्त पैसे देऊन नागरिक पाणी विकत घेतात. तसेच, काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या मेहेरबानीने पाणी दिले जाते. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामावर परिणाम होत असून आरोग्य, रोजगार, जीवनमानावरही विपरीत परिणाम होत आहे. – सीताराम शेलार, अध्यक्ष, पाणी हक्क समिती