मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा २८ टक्क्यांवर आला असून मुंबईकरांना यंदा पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. येत्या १५ मेपासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्याची माहिती पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली. राखीव साठा मिळाला तरी यंदा पाणी कपात अटळ आहे.

यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महापालिकेला राखीव साठा वापरण्यास मंजुरी दिली, तरी यंदा पाणी कपात करण्याची वेळ येणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतील पाणीसाठा कमी होत असून सध्या सातही धरणांत मिळून २८.३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे. मात्र मुंबईची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईला सध्या दररोज ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. बाष्पीभवन आणि पाणीपुरवठा याचा विचार केल्यास धरणातील पाणीसाठा जेमतेम जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरणार आहे. मुंबई महापालिका दरवर्षी जुलै अखेरीसपर्यंत पाणीसाठा पुरेल यादृष्टीने पाण्याचे नियोजन करीत असते. मात्र धरणातील पाणीसाठा पुरेसा नसल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे.

उर्ध्व वैतरणा आणि भातसा धरणातील राखीव साठा हवा…

मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारला पत्र पाठवून उर्ध्व वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष घनमीटर, तर भातसा धरणातून १ लाख ४० हजार दशलक्ष घनमीटर (एमसीएम) राखीव साठ्यातील पाण्याची मागणी केली आहे. मात्र हा पाणीसाठा मिळाला तरी पाणी कपात करावी लागणार आहे.

१७ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल

सध्या असलेला पाणीसाठा अधिक राखीव साठा आणि १० टक्के कपात या पद्धतीने नियोजन केल्यास १७ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करता येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली.