मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ३० सप्टेंबर रोजी १०० टक्के पाणीसाठा असेल तरच पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे, असे म्हणता येते. मात्र, ४ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध धरणांतील पाणीसाठा सुमारे ९५ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबई महानगरात लागू असलेली १० टक्के पाणीकपात तूर्तास मागे घेणे शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासनाच्या वतीने मांडली आहे. मात्र या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे प्रभावीपणे निराकरण करावे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर अभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन तक्रार सोडवावी, असेही निर्देश बांगर यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची आढावा बैठक शुक्रवारी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले. उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्तम माळवदे, उप जल अभियंता मंगेश शेवाळे उपस्थित होते. यावेळी बांगर यांनी जल अभियंता विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांच्याशी संवाद साधला. पाणीपुरवठ्यातील अनियमितता, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, वितरणाच्या वेळेतील बदल, जलवाहिन्यांमधील गळती तसेच अन्य तांत्रिक अडचणींबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास केवळ तात्पुरती उपाययोजना न करता तक्रारीच्या मूळ कारणांचा शोध घ्यावा.
त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू असून टोकावरील वस्त्या, उंचावरील भाग किंवा अन्य संवेदनशील क्षेत्रांना झळ पोहोचत आहे. पाणी कपातीमुळे काही प्रमाणात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित असले, तरी १० टक्क्यांपेक्षा अधिक तुटवडा जाणवत असल्यास, तेथील नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी जल अभियंता विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. पाणीपुरवठ्याचे परिक्षेत्र लक्षात घेता ठराविक दिवसांपैकी १ दिवस तरी पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून टोकाच्या भागात पुरेशा दाबाने पाणी पोहोचू शकेल.
सद्यस्थितीत लागू असलेल्या पाणीकपातीबाबत लोकप्रतिनिधी, नागरिकांना अवगत करावे. त्याचेवळी वितरण व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या विनाविलंब दूर कराव्यात जेणेकरून पाणीकपातीची कमीत कमी झळ नागरिकांना पोहोचेल, असेही बांगर यांनी यावेळी सांगितले. मुंबईत ऑगस्ट २०२६ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यातदेखील सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये ३० सप्टेंबररोजी १०० टक्के पाणीसाठा असेल तरच पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे, असे म्हणता येते. मात्र, ४ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध धरणांतील पाणीसाठा सुमारे ९५ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबई महानगरात लागू असलेली १० टक्के पाणीकपात तूर्तास मागे घेणे शक्य नाही, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.
