मुंबई : वांद्रे पूर्व ते जोगेश्वरी पूर्व परिसरात येत्या मंगळवारी चोवीस तासासाठी पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. काही भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असून काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. देशांतर्गत विमानतळ आणि वांद्रे टर्मिनसचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आजच पाणी भरून ठेवावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या के दक्षिण आणि एच पूर्व म्हणजेच वांद्रे ते जोगेश्वरी परिसरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या अंतर्गत २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून ते बुधवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून ते बुधवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत अंधेरी ते जोगेश्वरी पूर्व भागात (के दक्षिण) विभागातील काही परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तर संपूर्ण वांद्रे ते खार पूर्व (एच पूर्व) विभागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

कमी दाबाने पाणी पुरवठा होणारा परिसर –

के दक्षिण विभाग : कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, मासळी बाजार (फिश मार्केट), घाटीवाडा, चकाला, पी ऍन्ड टी वसाहत ( दुपारी ०२ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)
कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड), मोगरापाडा (सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)
बुधवारी १२ ऑगस्ट २०२६ – सहार गाव, सुतार पाखडी, कार्गो संकुल ( सकाळी ५ ते ८ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)

पाणी पुरवठा बंद रहाणारा परिसर –

एच पूर्व विभाग : मंगळवारी ११ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट देशांतर्गत विमानतळ, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत, सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस, वांद्रे – कुर्ला संकुल वांद्रे (पूर्व ) येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

बुधवारी १२ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व), वांद्रे (पूर्व) भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.