मुंबई : मुंबईतील सातही जलाशयांमध्ये एकूण पाणीसाठा आवश्यक क्षमतेच्या ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचला असला तरी राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १० टक्के पाणीकपात वर्षअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमलेला असल्यामुळे पाणी कपात मागे घेण्यासाठी नगरसेवकांचा दबाव वाढू लागला आहे. मात्र पाणी कपात मागे घेण्यास प्रशासन तयार नसल्यामुळे पाणी कपातीवरून नगरसेवक विरुद्ध प्रशासन असे शीतयुद्ध सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांमध्ये मिळून सोमवारी सकाळी ९६.८९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सात जलाशयांमध्ये सुमारे १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्यक आहे. २८ सप्टेंबर रोजी हा साठा १४.०१ लाख दशलक्ष लिटर, म्हणजेच ९६.८९ टक्के इतका होता. सप्टेंबर अखेरीस सर्व जलाशये १०० टक्के भरलेली असली तर वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो असे महापालिकेचे आजवरचे गणित आहे. त्यामुळे जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यास ३० सप्टेंबरनंतर पाणीकपात मागे घेण्याचा विचार पालिकेने केला होता. मात्र, राज्य सरकारने ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध राहील याची खबरदारी घेण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या साठ्याचा काळजीपूर्वक वापर करण्यावर भर दिला जात आहे.

१०० टक्के पाणीसाठाही अपुरा

– यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयातील पाणीसाठा साडेसहा टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. मात्र गेल्या चार महिन्यात पडलेल्या पावसामुळे जलाशयांमध्ये चांगला पाणीसाठी जमा झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून जलाशये १०० टक्के भरली तरी मे महिन्यात पाणीसाठा कमी होत असल्याने मे महिन्यात पाणीकपात करावी लागत आहे.

– मुंबईत वेगाने वाढत चाललेल्या बांधकामांमुळे धरणातील पाणीसाठा पुरेनासा झाला आहे. मुंबईला सध्या दरदिवशी ४१०० दशलक्षलीटर पाणीसाठा पुरवला जातो. प्रत्यक्षात ४६०० दशलक्षलीटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे आधीच प्रतिदिन ५०० दशलक्षलीटरचा तुटवडा आहे. त्यामुळे जलाशये पूर्ण भरली तरी ते पाणी पुरेनासे असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दुष्काळामुळे पाणी पुरवण्याचे आव्हान

गेल्या काही वर्षांपासून धरणे १०० टक्के भरली तरी मे महिन्यात भातसा आणि उर्ध्व वैतरणा या राज्य सरकारच्या मालकीच्या धरणातून राखीव साठ्याला हात घालावा लागतो. त्यातच यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले असल्यामुळे पाण्याचा काटेकोर वापर महापालिकेला करावा लागणार आहे. त्यामुळे जलाशय ९७ टक्के भरले असतानाही मुंबईकरांना पाणीकपातीपासून तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.