scorecardresearch

मुंबईत आज पाणीकपात; उपनगरांत पुरवठा पूर्णपणे खंडित, प्रभादेवी, दादर, माहीममध्ये कपात

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे.

water supply close
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : महत्त्वाच्या तांत्रिक कामासाठी मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा आज, सोमवारी २४ तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून मध्य मुंबईच्या काही भागांत पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आली.

सोमवार, ३० जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून ३१ जानेवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांपैकी १२ विभागांतील पाणीपुरवठा पूर्णत: बंद असेल. तसेच दोन विभागांतील पाणीपुरवठय़ात २५ टक्के कपात करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांमुळे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या पाच दिवसांत अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, त्यामुळे  मुंबईकरांनी पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहनही माळवदे यांनी केले.

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित विविध जल वाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसविणे, नव्या जलवाहिन्यांची जोडणी करणे, दोन ठिकाणची गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे काही भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवणे आणि काही ठिकाणी पाणी कपात करणे अपरिहार्य असल्याचेही माळवदे यांनी स्पष्ट केले.

बंद कुठे?

पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिम, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, वांद्रे पूर्व आणि पश्चिम या नऊ भागांमधील अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. तसेच पूर्व उपनगरातील भांडूप, घाटकोपर, कुल्र्याच्या अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात येईल.

जपून वापरा..

पाणीपुरवठा खंडित असताना किंवा कमी दाबाने पुरवठा होत असताना नागरिकांनी पाणी जपून वापरावे, त्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

कपात कुठे? 

दादर, माहीम पश्चिम, प्रभादेवी आणि माटुंगा पश्चिम या भागांतील पाणीपुरवठय़ात आज, सोमवारी आणि उद्या मंगळवारी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागांत दुपारी ४ ते रात्री ९ दरम्यान पाणीपुरवठा होतो, तेथे आज पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 02:01 IST
ताज्या बातम्या