मुंबई : शहर आणि पूर्व उपनगरात पुढील आठवडाभर पाणी पुरवठ्यात पाच टक्के कपात करण्यात येणार आहे. जलबोगद्याच्या क्लोरीनीकरणाच्या कामासाठी ही कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते लालबाग परळ, वडाळ्यापर्यंतचा भाग आणि पूर्व उपनगरात कुर्ला ते मुलुंडपर्यंत पाणी पुरवठ्यात पाच टक्के कपात करण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आधीच पाणी कमी दाबाने येत असताना त्यात एकापाठोपाठ एका भागात दुरुस्तीच्या कारणासाठी पाणी कपात करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्यातच येत्या २० एप्रिल पासून जलबोगद्यांच्या स्वच्छतेसाठी शहर आणि पूर्व उपनगरातील पाणी पुरवठ्यात पाच टक्के कपात करण्यात येणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षात जलबोगदे बांधले आहेत. अमर महल (हेगडेवार उद्यान) ते वडाळा (प्रतीक्षा नगर) आणि पुढे परळ (सदाकांत धवन उद्यान) जलबोगदा १ (एएमटी-१) कार्यान्वित आहे. तसेच, अमर महल (हेगडेवार उद्यान) ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय आणि पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय जलबोगदा २ (एएमटी-२) हादेखील अविरत कार्यरत आहे. जलबोगद्याद्वारे होणा-या पाणीपुरवठ्याचे भरण (चार्जिंग), धुलाई (फ्लशिंग), क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. ही सर्व कामे सोमवार, दिनांक २० एप्रिल ते सोमवार, दिनांक २७ एप्रिल या कालावधीत केली जाणार आहेत.

परिणामी, मुंबई पूर्व उपनगरातील कुर्ला पूर्व(एल विभाग), देवनार, मानखुर्द(एम पूर्व) गोवंडी (एम पश्चिम) विद्याविहार, घाटकोपर (एन), भांडूप (एस) मुलुंड (टी) आणि मुंबई शहरातील चर्चगेट (ए), मशीद बंदर, डोंगरी(बी), गिरगाव, मुंबादेवी (सी), भायखळा (ई), वडाळा(एफ उत्तर) आणि परळ, लालबाग, शिवडी ( एफ दक्षिण) या विभागात पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात लागू राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.