मुंबई : पाणीपुरवठा खंडित होणार असल्याची माहिती महापालिकेकडून वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांची बुधवारी प्रचंड गैरसोय झाली. मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठ्याच्या स्थितीची स्पष्टताच नसल्याने नागरिकांची दैनंदिन सर्व कामे रखडली. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी पाणी न आल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

पडघा वीज उपकेंद्रातून पिसे व पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पाला केला जाणारा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मंगळवारी सायंकाळी ५:४५ ते ६:१५ या कालावधीत जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कार्यावर परिणाम झाला. परिणामी, पिसे व पांजरापूर येथून होणारा मुंबई १ व मुंबई २ टप्प्याचा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे एम.बी.आर. (Master Balancing Reservoir) जलाशय पातळी पूर्ववत होईपर्यंत सध्या चालू असलेल्या पाणीपुरवठ्यात रात्री ९ पर्यंत २० ते २५ टक्के कपात करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी रात्री उशिरा कळवले. वेळेत माहिती उपलब्ध न झाल्यामुळे नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा झाला नाही.

दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यास २ तास लागणार असल्याचेही पालिकेने उशिराच कळवले. शहर व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठ्यात २० ते २५ टक्के कपात, तसेच पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे पालिकेने स्पष्ट केले. पालिकेच्या माहितीनुसार बुधवारी पहाटेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. दरम्यान, दक्षिण मुंबईमधील काही भागात पहाटे पावणेपाचच्या सुमारास पाणीपुरवठा होतो. मात्र नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अनेक रहिवासी हैराण झाले होते. नेमके काय झाले ते कळत नसल्यामुळे रहिवाशांची धावपळ उडाली. मात्र पहाटे साडेसहाच्या सुमारास कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने रहिवाशांना पुरेसे पाणी मिळाले नाही.

१६, १७ एप्रिलला पाणपुरवठा खंडीत

दरम्यान, उद्या आणि परवा म्हणजेच १६ व १७ एप्रिल रोजी दक्षिण मुंबईतील अनेक भागात पाणी येणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग एफ दक्षिण विभागात दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार आहे. या कामामुळे आणखी दोन दिवस पाणीपुरवठा खंडीत राहील.