मुंबई:मुंबईत पाणीकपात लागू असताना दुसरीकडे जलवाहिन्यांमधील गळती आणि अनधिकृत नळजोडण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे आढळून आले आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत पाणी गळतीच्या तब्बल १७,९०६ तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या. याच कालावधीत ४,०९० अनधिकृत नळजोडण्यांचीही नोंद झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी ४१००

दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात मुंबईची पाणी पुरवठ्याची दैनंदिन गरज ही ४६०० दशलक्षलीटर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सात जलाशयातील पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने गारगाई धरण, निःक्षारीकरण प्रकल्प, सांडपाण्याचा पुनर्वापर असे विविध प्रकल्प आखत आहे. मात्र एकाबाजूला असलेल्या पाण्यापैकी ३४ टक्के पाणी हे पालिकेच्या हिशोबाच्याबाहेर असल्याची कबूली पालिका प्रशासनाने दिली आहे. दररोज सुमारे ४,८०० एमएलडी पाणी धरणांमधून उचलले जाते, त्यापैकी सुमारे ४,१०० एमएलडी पाणी नागरिकांना पुरवले जाते. उर्वरित पाण्यापैकी मोठा हिस्सा गळती, चोरी अथवा सदोष मीटरिंगमुळे कमी होतो.

मुंबईला पाणी पुरवठा करणारी सातही धरणे यंदा ९७ टक्के भरली होती. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात धरणातील साठा ९४ टक्क्यांच्या खाली आला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे हे पाणी पुढील वर्षीच्या ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. मुंबईत सध्या १० टक्के पाणी कपात लागू आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मुंबईच्या पाणी पुरवठ्याबाबत एक सादरीकरण स्थायी समितीमध्ये केले. त्यावेळी प्रशासनाने या हिशोबबाह्य पाण्याची माहिती सदस्यांना दिली.

पाण्याच्या गळतीच्या एकूण तक्रारी …..१७,९०६ शहर ….. ५,३७५,

पूर्व उपनगरांतील …..६,५१३

पश्चिम उपनगरांतील ….. ६,०१८

अनधिकृत नळजोडणी ….. ४,०९०

दरम्यान, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेविका वर्षा टेंबवलकर यांनी जुन्या तसेच नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जलवाहिन्यांमधील गळती आणि पाणी दूषित होण्याच्या संभाव्य घटना वेळीच शोधता येतील, असे त्यांनी सुचविले. त्यावर विविध उत्पादकांच्या आधुनिक गळती शोध यंत्रणांच्या चाचण्या घेऊन योग्य तंत्रज्ञान निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रत्येक जुन्या जलवाहिनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याऐवजी गळतीचा संशय असलेल्या ठिकाणी साउंडिंग, टी-१० लीकेज डिटेक्शन मशीन आणि अन्य योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार विशिष्ट ठिकाणी सीसीटीव्ही तपासणी करून गळती किंवा दूषित पाणी जलवाहिनीत शिरण्याची शक्यता पडताळली जाईल. त्यानंतर दुरुस्ती केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले.

सध्या गळती शोधण्यासाठी पारंपरिक साउंडिंग रॉडचा वापर केला जातो. मात्र, मुख्य जलवाहिनीची खोली १० फुटांपेक्षा अधिक असल्यास, विशेषतः सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखाली गळती शोधताना या पद्धतीला मर्यादा येतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान न करता गळतीचे अचूक ठिकाण शोधणारे आधुनिक, विश्वासार्ह आणि किफायतशीर तंत्रज्ञान वापरण्याची गरज असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.