मुंबई : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने उपलब्ध पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी वापरावर निर्बंध घालण्याचे ठरवले आहे.

बांधकामांना व जलतरण तलावांना दिलेल्या जलजोडण्या खंडित करण्यात येणार आहेत. तसेच औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या उपाययोजनांची बुधवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जून महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले तरी पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत असून सातही धरणांत केवळ १०.३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्याने उपलब्ध पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे. त्यामुळे पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुंबईत आधीच १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही बुधवार, १७ जून २०२६ पासून मर्यादा घालण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करत काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणी कपातीच्या कालावधीत करावयाच्या उपायोजनांबाबत सविस्तर परिपत्रक निर्गमित केले आहे.

हे आहेत निर्बंध

नव्या उपाययोजनांप्रमाणे सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात येणार असून नवीन बांधकामांसाठी दिली जाणारी जल जोडणी स्थगित करण्यात आली आहे. तसेच, सर्व जलतरण तलावांच्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर अथवा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. जलजोडणीधारकांकडून वाढीव जलजोडणी / अतिरिक्त जलजोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठी तयार होईपर्यंत मागणी प्रलंबित ठेवण्यात येणार आहे. औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. शीतपेये किंवा

बाटलीबंद पाणी उद्योगाला दिलेल्या जलजोडण्यातून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाण्याची तूट

मुंबईची सध्याची पाण्याची गरज ही प्रतिदिन सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र मुंबईला प्रतिदिन सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. आधीच पाण्याची तूट असून मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.

स्वच्छतागृहांसाठी टॅंकरचे पाणी वापरा

सार्वजनिक स्वच्छतागृह व प्रसाधनगृह सांभाळणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त टॅंकर / बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा व पिण्याच्या पाण्याची बचत करावी. पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त, इतर वापरासाठी विहिरी, कुपनलिका, विधनविहिरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा. वाहन धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे, रस्ता / परिसर धुण्यासाठी बोअरवेल अथवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा. मध्य रेल्वे / पश्चिम रेल्वे /आरसीएफ, एचपीसीएल आदी आस्थापनांनी दुय्यम वापरासाठी व परिचालनासाठी कुलाबा, तसेच इतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील प्रक्रियायुक्त पाण्याचा फेरवापर करावा, असेदेखील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.