मुंबई : मार्च महिना सुरू झाला असून मुंबईच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी समस्येचा पाढा वाचला. दादरसारख्या महत्त्वाच्या भागातही पाणी टंचाई भेडसावत असून मुंबईत अगदी दहिसर बोरिवलीपासून पूर्व उपनगरात भांडुपपर्यंत संपूर्ण मुंबईत पाण्याचा दाब कमी असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. पाणीपुरवठ्याबाबत एक विशेष बैठक घेण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.

मुंबई महापालिकेच्या आर/ मध्य विभागातील बोरिवली टेकडी जलाशयांच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी केल्या. महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी बोरिवली टेकडी जलाशयांच्या कामामुळे पाणीसाठ्याची क्षमता किती वाढणार असा सवाल केला. त्यानंतर, भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी त्यांच्या प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली. शिवसेनेच्या (शिंदे) अंजली नाईक यांनी त्यांच्या विभागातील भारत नगर भागात पाणी समस्या भेडसावत असल्याने दुसरीकडून डोक्यावरून पाण्याचे हांडे भरून आणावे लागत आहेत. तसेच, पाण्याचे टँकर मागवून पाणीपुरवठा करावा लागत असल्याची तक्रार केली. तर दादरसारख्या मध्यवर्ती भागातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केली.

भांडुप संकुलामध्ये मुंबई महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प असून इथूनच संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र भांडुप टेकडी भागातील नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविका दीपमाला बढे यांनी केली. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या डॉ. सईदा खान यांनी चार वर्षे नगरसेवक पदावर नसताना असे काय झाले की, पाणी समस्या भेडसावत आहे ? पाणी वितरणात अडचण का येत आहे, असे सवाल उपस्थित करीत प्रशासनाला जाब विचारला.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नगरसेवकांनी केलेल्या पाणी समस्येबाबतच्या तक्रारींची दखल घेतली. मुंबईत विशेषतः दादरसारख्या ठिकाणी पाणी समस्या असणे ही गंभीर बाब असून जल अभियंता खात्याने पाणी समस्येचे कारण शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करावी. मुंबईत ६०० ते ८०० दशलक्ष पाण्याचा कमी पुरवठा होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गारगाई धरण प्रकल्प लवकरात

लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच पाणीपुरवठ्याबाबत एक विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.