मुंबई : जुलै महिन्यातील दमदार पाऊस आणि ऑगस्ट महिन्यात अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणीसाठ्यात यंदा भरघोस वाढ झाली असून सात धरणात मिळून ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे वर्षभराची पाणीचिंता यंदा मिटली आहे.
उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा सोमवारी २ सप्टेंबर रोजी ९६.९३ टक्के झाला. पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी सर्व जलाशये यंदा ९५ टक्के भरली आहेत. मुंबईच्या हद्दीतील विहार, तुळशी या जलाशयांबरोबरच भातसा आणि उर्ध्व वैतरणा ही दोन मोठी धरणे काठोकाठ भरल्यामुळे यंदा जलाशयात पाण्याची तूट नाही.
हेही वाचा – मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
जुलै महिन्यात कोसळणाऱ्या पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यांत चांगलीच वाढ झाली. पाणीसाठा ७३ टक्के झाल्यानंतर पालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यापासून मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे घेतली. त्यावेळी धरणातील पाणीसाठ्यात २८ टक्के तूट होती. ऑगस्ट महिन्यात किती पाऊस पडेल यावर ही तूट भरून निघते का याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले होते. ही तूट भरून निघाली नसती तर पुढील वर्षी पुन्हा एकदा कपात करण्याची वेळ आली असती. मात्र ऑगस्ट महिन्यात मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये पडलेल्या पावसामुळे तलावांतील पाणीपातळीत रोज वाढ होत असून पाणीसाठा ९७ टक्के झाला आहे.
सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत १४ लाख २ हजार ९९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबर महिन्यात पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते. मात्र थोडीशी तूट राहिली तरी पाणी कपात करण्याची वेळ येते. यंदा मात्र ही चिंता मिटल्याची चिन्हे आहेत.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
उर्ध्व वैतरणा – ९७.०३ टक्के
मोडक सागर – ९८.७८ टक्के
तानसा – ९८.२४ टक्के
मध्य वैतरणा – ९८.९९ टक्के
भातसा – ९५.६० टक्के
विहार – १०० टक्के
तुळशी – १०० टक्के