मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक जलसाठा असूनही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची खंत मुंबईकर व्यक्त करीत आहेत. परिणामी, अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मुंबईकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेने भांडुप संकुलातील ४ उदंचकांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली असून लवकरच त्यांना कार्यादेश देण्यात येणार आहे. या एकूण कामासाठी सर्व करासहित सुमारे ४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संबंधित चार उदंचकांची सुमारे पाच वर्षांपासून दुरुस्ती व नूतनीकरण झालेले नाही.
भांडुप संकुल उदंचन केंद्र १९७९ – ८० साली कार्यान्वित झाले. मुंबईकरांना अखंडपणे पाणीपुरवठा करता यावा, यासाठी उदंचन केंद्रात २४६ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ११ व ८२ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ३ असे एकूण १४ उदंचक कार्यरत आहेत. या केंद्रातून २४६ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ७-८ आणि ८२ दशलक्ष लिटर क्षमतेचे २ उदंचक चालविले जातात. ही यंत्रे न थांबता सलग काही महीने सुरू राहत असल्याने विविध कारणांनी उदंचकातील भागांची झीज झाली आहे. उदंचकांच्या सततच्या फिरण्यामुळे कालांतराने त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे. उदंचकांची कार्यक्षमता टिकवण्यासाठी नियमित प्रतिबंधात्मक देखभालीबरोबरच मुख्य दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत मुंबईतील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणांमध्ये मुबलक साठा असूनही रहिवाशांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. मुंबईकरांना पुरेशा दाबाने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी भांडुप संकुलातील ४ उदंचकांची दुरूस्ती व नूतनीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या कामासाठी तीन कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एका कंत्राटदारांची निवड करून संबंधित कामाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता.
मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा असल्याने कोणीही या विषयावर फारसा आक्षेप घेतला नाही. विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. संकुलातील १४ उदंचकांपैकी ८ यंत्रांची २०२३ ते २०२५ या कालावधीत दुरुस्ती करण्यात आली. उर्वरित ६ उदंचकांपैकी ४ उदंचक सुमारे ५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून आता त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांची लवकरच मुख्य दुरुस्ती करण्यात येणार आहे.
दरम्यान, या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामानंतर मुंबईकरांना अती जलद प्रवाहाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच, उदंचकांचे आतील भागांचे गंजण्यापासून व पाण्याच्या प्रवाहामुळे होणाऱ्या धातुच्या ऱ्हासापासून संरक्षण मिळेल. परिणामी, उदंचकांचे आयुष्मान वाढेल.
