मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाचा अभाव असून त्यामुळे उकाड्यातही काहीशी वाढ झाली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत शनिवारी आणि रविवारी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांच्या तुलनते उत्तर कोकण प्रदेशात पावसाचा जोर काहीसा वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने, तसेच उष्ण आणि दमट वातावरणामुळे मुंबईकरांना मागील अनेक दिवसांपासून उकाड्याचा सामाना करावा लागत आहे. हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३२.७ अंश सेल्सिअस जे सरासरी कमाल तापमानाहून २.२ अंशांनी अधिक होते, तर सांताक्रुज केंद्रात ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

१२ ते १५ सप्टेंबरपर्यत उत्तर कोकणावर पावसाचा प्रभाव ?

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून या दरम्यान समाधानकारक पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. कमी दाबाच्या क्षेत्राकडे अधिक आर्द्रता खेचली जाऊन त्याच्या लगतच्या प्रदेशात मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे १२ ते १५ सप्टेंबरपर्यंत उत्तर कोकणावर पावसाचा प्रभाव राहील, शनिवारी ढंगाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज असून रविवारी उत्तर कोकणातील बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान पालघर जिल्ह्यातील काही भागात अधिक पाऊस पडेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाचा जोर वाढल्यास उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईत जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस पडला. मात्र, त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात मुंबईत पावसाचे प्रमाण कमीच राहिल्याने पावसाची तूट निर्माण झाली. दरम्यान, मोसमी पावसाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात वादळी पावसामुळे ऑगस्टच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत पावसाचा जोर कमीच असून १ ते ११ सप्टेंबर या कालावधीत नोंदल्या गेलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात केवळ २७. ९ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथे ७९ टक्के पावसाची तूट आहे. तर सांताक्रुज केंद्रात ३६ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथे पावसाची तूट ७६ टक्के इतकी आहे.