मुंबई : राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून बदल होत असून सध्या राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती तर काही ठिकाणी वादळी पावसाची नोंद होत आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून सकाळी ढगाळ वातावरण असले तरीही दुपारच्या सुमारास उकाड्याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. तसेच रात्री शहरात उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दरम्यान, गुरुवारी आणि शुक्रवारी शहरात उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे कोकण पट्ट्यातील काही भाग, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. तर विदर्भातील काही भागात उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती आहे. राज्यातील अनेक भागांना हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात मंगळवारीही अनेक भागात पावसाची नोंद झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारनंतर नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पुढील दोन दिवसात राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून त्यांनतर तीन दिवसांनी २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कमाल तापमान

३३ ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदले जात आहे. शहरात मंगळवारी हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्रात ३३.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्रात २५.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २५.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, शहरात बुधवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उष्ण आणि दमट वातावरण कुठे ?

मुंबई आणि ठाणे येथे गुरुवारी आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून गुरुवारी आणि शुक्रवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.