मुंबई : मुंबई आणि उपनगरात मागील काही दिवसांपासून सकाळी ढगाळ हवामान दिसून येत असून यामुळे पहाटे आणि सकाळच्या वेळी काही काळ गार वाऱ्यांचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. शहरात ढगाळ हवामान गुरुवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून उत्तर कोकणातील काही भागात गुरुवारी हलक्या सरींची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

राज्यात मुख्यतः मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक भागात पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांची नोंद झाली. यादरम्यान काही वेळा मुंबईतही हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या काळात मुंबईत पावसाची नोंद झाली नाही. मुंबईत मागील काही दिवसांपासून सकाळच्या वेळी ढगाळ हवामान दिसून येत आहे. शहरात बुधवारी सकाळपासून ढगाळ हवामान आहे. तसेच मागील काही दिवसांच्या तुलनेत ढगांची दाटी अधिक दिसून येत आहे.

या भागात हलक्या सरींची शक्यता

मुंबईत बुधवारी दिवसभर अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासकांच्या मतानुसार, पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव दक्षिणेकडे सरकत असून यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. पुढील काही काळ ढगाळ हवामान आणि वातावरणातील गारवा कायम राहणार आहे. दरम्यान, हवामान अभ्यासकांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी हलक्या सरींची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान, मुंबईतील कमाल तापमानातही मागील काही दिवसांच्या तुलनेत घट झाल्याने मुंबईकरांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जे सरासरी तापमानापेक्षा २ अंशांनी कमी नोंदले गेले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईच्या हवामानात बदल झाल्याने सध्या तरी उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात मागील काही दिवस पावसाळी हवामान कायम होते. मात्र पश्चिमी विक्षोभ पुढे सरकल्याने राज्यावरील पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी झाला आहे. सध्या राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानातही घट झाल्याने तीव्र उन्हापासून नागरिकांची काही काळ सुटका झाली आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून यामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.