मुंबई : मागील काही दिवसांच्या तुलनेत बुधवारी मुंबईतील उकाड्यात लक्षणीय वाढ होऊन पारा ३८.७ अंशावर पोहोचला. यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात मंगळवारच्या तुलनेने ५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद बुधवारी झाली. पुढील दोन ते तीन दिवस राज्याच्या उत्तरेकडील भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे मुंबईकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे.

मुंबईत सध्या उष्ण आणि दमट वातावरण आहे. मंगळवारी हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्रात ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. बुधवारी पारा थेट ३५ अंशाच्या वर गेल्याने मुंबईच्या तापमानात ५ अंशांची वाढ झाली आहे. कुलाबा केंद्रात बुधवारी ३५.७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३८.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मुंबईत फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर २१ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक नोंदवला जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात राज्याच्या उत्तरेकडील भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई आणि उपनगरातील किमान तापमानातही वाढ झाली असून यामुळे पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवाही कमी झाला आहे. बुधवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात २२.६, तर कुलाबा केंद्रात २४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात २ अंशांनी वाढ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आजही मुंबईसह कोकणपट्ट्याला ‘यलो अलर्ट’

मुंबईत सध्या उष्ण आणि दमट हवामान आहे. गुरुवारीही उष्ण आणि दमट हवामान कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड आदी भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.