मुंबई : मुंबईतील अनेक भागात मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढत असून मंगळवारी आणि बुधवारी पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे काही भागात आज दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उपनगरात रात्रीपासून मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद होत असून सकाळी हवामान विभागाकडून उपनगरांसाठी दुपारी १ पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
गेले काही दिवस मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. त्यामुळे दिवसाही काहीसा उकाडा जाणवत होता. अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद मागील काही दिवसात झाली असली तरीही मुसळधार पावसाचा अभाव होता. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून शहरातील काही भागात चांगला पाऊस नोंदवला जात असून उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागली. सध्या मध्य प्रदेशावर कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव असून त्यामुळे कोकण प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांच्या तुलनेत मंगळवारपासून मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे.
बुधवारीही ‘यलो अलर्ट’
ठाणे आणि मीरा भाईंदरसह वसई, विरार परिसरातील काही भागातही सकाळपासून चांगला पाऊस नोंदवला जात आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला आज वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली असून मुबंईसह ठाणे जिल्ह्याला मंगळवारी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात बुधवारीही मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
कुठे किती पाऊस ?
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३२.५, तर सांताक्रूझ केंद्रात ३१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती, जे सरासरी कमाल तापमानाहून २ अंशांनी अधिक होते. तसेच सोमवारी रात्री ८ ते मंगळवारी सकाळी ८ यादरम्यान मुंबईच्या मध्य उपनगरात १४.२० मिमी, पूर्व उपनगरात १८.२० मिमी, तर पश्चिम उपनगरात १२.९३ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारी मुसळधार पावसाची, तर पुढील तीन दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
