मुंबई : मागील काही दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत कमाल तापमानात काहीसा चढ -उतार होत असला तरीही उकाडा कायम आहे. दरम्यान, बुधवारपासून या प्रदेशातील काही भागात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती, तर काही भागात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत असून गुरुवारीही पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती तर उर्वरित प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. उत्तर कोकणातील सर्वच भागात शनिवारपर्यंत हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
देशातील काही भागांसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णेतची लाटेसदृश्य स्थिती नोंदली जात आहे. दरम्यान, शुक्रवारपासून या स्थितीची तीव्रता कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर राज्यातील मराठवाडा येथील काही भागात गारपिटीची, तर मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची नोंद होत आहे. तसेच कोकण प्रदेशातही दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची नोंद होत असून उर्वरित भागात उन्हाची काहिली नागरिकांना सहन करावी लागत आहे.
मुंबईसह उत्तर कोकणातील बहुतांश भागात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. तापमानाचा पारा ३४ ते ३८ अंशांच्या दरम्यान नोंदला जात असला तरीही प्रत्यक्षात मात्र त्याहून अधिक उष्णता सहन करावी लागत आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर येथे शनिवारपर्यंत हवामान कोरडे राहणार असून या प्रदेशात रविवारी आणि सोमवारी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांना मोसमी पूर्व सरींमुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्यात पुढील दोन दिवसांनी कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उत्तर कोकणात उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. डहाणू येथे गुरुवारी ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जे सरासरी कमाल तापमानाहून २.२ अंशांनी अधिक होते. तर हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३५.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथे २८.३ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शहरात रात्रीचा उकाडाही कायम आहे. दरम्यान, शहरात आणि उपनगरात शुक्रवारी ढगाळ वातावरण राहील, तसेच कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
