मुंबई : मागील काही दिवस राज्यातील काही भागात जोरदार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांची नोंद होत आहे. मुंबईतही काही दिवसांपूर्वी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, केवळ तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. शहर आणि उपनगरांसह उत्तर कोकणातील काही भागात गुरुवारी हलक्या सरींची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील विविध भागात पावसाची नोंद होत असताना मुंबईत मागील काही दिवसांपासून तीव्र उकड्यापासून नागरिकांची सुटका झाली होती. तसेच किमान तापमानातही घट झाल्याने एप्रिलमध्ये पहाटे काही काळ गारवा अनुभवता येत होता. तसेच वाऱ्यांचा वेगही वाढल्याने संध्याकाळी शहरात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दिलासा मिळत होता.
मुंबईसह पालघर आणि ठाण्यातही पावसाची शक्यता
इतर भागातही पावसाची स्थिती पाहताना मुंबईत पाऊस कधी पडणार हा प्रश्न मुंबईकरांना नेहमीप्रमाणे सतावू लागला होता. दरम्यान, शहरात गुरुवारी हलक्या सरींची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. शहर आणि उपनगरात गुरुवारी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही भागातही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यात वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत फार कमी वेळेला एप्रिल महिन्यात पावसाची नोंद होते. मात्र, पावसाची नोंद झाल्यास नागरिकांना काही काळ उष्ण आणि दमट हवामानापासून दिलासा मिळत असतो. पुढील दोन दिवस शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईसह, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी आदी भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसात राज्यातील किमान तापमानात वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागील काही दिवसांच्या तुलनेत मुंबईतील किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. तर बुधवारी शहरातील कमाल तापमानातही १ अशांनी वाढ नोंदली गेली. पुढील तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे मुंबई आणि शहरातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सियअस राहील, अशा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
