मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदली जात होती. मात्र, सोमवारी मुंबईतील किमान तापमानात रविवारच्या तुलनेत ३ अंशांनी घट नोंदली गेली. यामुळे मागील काही दिवसांच्या तुलनेत मुंबईकरांना पहाटे काहीसा गारवा अनुभवयाला मिळाला. तसेच सध्या शहरात रात्रीच्या वेळीही गार वारे वाहत असल्याने दुपारच्या काहिलीनंतर नागरिकांना दिलासा मिळत आहे.

राज्यात पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी झाला आहे. शहरात सध्या वाऱ्यांचा वेग अधिक आहे. तसेच उत्तरेकडून येणारे वारेही वाहत असल्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानही काहीशी घट झाली आणि तसेच काही ठिकाणी किमान तापमानातही घट नोंदली जात आहे. रविवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ २५.२ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात २४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्राने २२.९ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात २३.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान सोमवारी नोंदवले. सांताक्रूझ येथील किमान तापमानात ३ अंश इतकी घट नोंदली गेली. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, सध्या शहरात कमाल तापमानही मागील काही दिवसांपासून काहीशी घट नोंदली जात आहे. हवामान केंद्राच्या सांताक्रूझ केंद्रात ३१.३ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद सोमवारी झाली.

त्यामुळे सामान्य तापमानाहून २ अंशांनी घट झाली आहे. शहरात उकाडा कायम असला तरीही सध्या तीव्र उकड्यापासून नागरिकांना काहीकाळ दिलासा मिळाला असला तरीही पुढील तीन दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे वाऱ्यांच्या वेगातही वाढ झाली आहे. तसेच उत्तरेकडूनही वारे वाहत आहेत यामुळे किमान तापमानान घट झाली असून ही स्थिती तात्पुरती आहे, असे हवामान विभागाने सांगितले.