मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात हळूहळू वाढ होत असून मुंबईकरांना उन्हाची काहिली सहन करावी लागत आहे. सध्या मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत आहे. यामुळे नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. दरम्यान, कोकणासह राज्यातील काही भागातील कमाल तापमानात पुढील चार दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून यादरम्यान मुंबई आणि उपनगरातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात पश्चिमी विक्षोभाची (वादळाची) स्थिती होती. यामुळे मुंबईसह कोकणातील कमाल तापमानात काहीशी घट नोंदली जात होती. तसेच यादरम्यान शहरातील किमान तापमानातही काहीशी घट नोंदली गेल्याने मुंबईकरांना एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसातही पहाटेच्या वेळी काहीसा गारवा अनुभवता आला होता. सध्या राज्यात पुन्हा पश्चिमी विक्षोभाची स्थिती असली तरीही मुंबईच्या कमाल तापमानात मागच्या काही दिवसांच्या तुलनेत वाढ नोंदली जात आहे. या कडक उन्हामुळे मुंबईकरांचे आरोग्य देखील बिघडत असून सर्दी ताप, डोकेदुखी याखेरीज डोळे कोरडे होणे, पोटदुखी असा त्रास उद््भवत आहे.

सकाळी आणि संध्याकाळी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने घामाच्या धारांमुळेही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, गुरुवारीही शहरात उष्ण आणि दमट वातावरण होते. हवामान केंद्राच्या सांताक्रूझ केंद्रात ३६ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमान मागील काही दिवसांपासून स्थिर आहे.

दरम्यान, मुंबईत समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा प्रभाव असतो. समुद्र जवळ असल्यामुळे हवेत पाण्याचे बाष्प जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हवामान दमट असते. म्हणजेच शरीरातून घाम येतो. त्यामुळे उष्ण आणि दमट वातावरणाची दाहकता अधिक जाणवते. शहरात शुक्रवारी आणि शनिवारी उष्ण आणि दमट वातावरण असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवारी दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या सरींचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात शुक्रवारी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आरोग्यावर होणारे परिणाम

  • या वातावरणाचा थेट परिणाम शरीरावर होतो.
  • उष्माघात, डोकेदुखी, त्वचेच्या समस्या, थकवा आणि पाण्याच्या कमतरतेचे त्रास वाढतो.
  • तापमान खूप वाढल्यास शरीराचे तापमान नियंत्रित न राहता अचानक चक्कर, उलट्या येणे.
  • जास्त घाम येतो पण भरपूर पाणी न प्याल्यास शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे थकवा जाणवतो.
  • दमट हवेमुळे त्वचेला पुरेशी हवा लागत नाही, परिणामी घामोळे, फंगल इंफेक्शन, खाज येणे, लालसरपणा दिसू शकतो.

हवामान विभागाचे आवाहन

  • शक्य असल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
  • पुरेसे पाणी प्या.
  • हलक्या, सूती कपड्यांचा वापर करावा.
  • थेट सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
  • उन्हात काम करणाऱ्यांनी १२ ते ३ या वेळेत विश्रांती घ्यावी.