हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे संगीतकार म्हणून सचिनदेव बर्मन यांचे आणि त्यांचे पुत्र राहुलदेव बर्मन यांनी हिंदी चित्रपट संगीतात दिलेले योगदान खूप मोठे आहे. हे दोघेही पिता-पुत्र त्यांच्या पूर्ण नावापेक्षा ‘एसडी’ आणि ‘आरडी’ या नावांनीच चित्रपटसृष्टीत आणि सर्वसामान्य रसिकांमध्ये जास्त परिचित आहेत. सहज गुणगुणता येईल आणि ओठावर रेंगाळेल अशी चाल हे ‘एसडी’ यांच्या गाण्यांचे वैशिष्टय़. ‘एसडी’ यांची ओळख संगीतकार अशी असली तरी ‘सुन मेरे बंधू रे सुन मेरे मितवा’, ‘मेरे साजन है उस पार’ किंवा ‘अल्ला मेघ दे छाया दे’ यांसारखी काही निवडक गाणी गाऊन गायक म्हणूनही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘आरडी’, ‘पंचमदा’ अशा नावाने अधिक परिचित असणाऱ्या आर.डी. बर्मन यांनी हिंदी चित्रपट संगीतात पारंपरिक वाद्यांबरोबरच पाश्चिमात्य वाद्यांचा वापर करून गाण्यांना वेगळा साज चढविला. वडिलांप्रमाणेच ‘आरडी’ यांनीही काही गाणी आपल्या स्वत:च्या खास ढंगात गायली. उडत्या चालींबरोबरच काही हळुवार आणि मनाला शांतता देणारी गाणीही आरडींनी दिली. या दोघांच्या सांगीतिक शैलीचा आढावा घेणारा एक विशेष कार्यक्रम प्रभादेवी येथे होत आहे. प्रसाद फणसे आणि नवरस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात त्या दोघांनी संगीतबद्ध केलेली मूळ गाणी ऐकविली जाणार आहेत, तर राधिका फणसे आणि त्यांचे सहकारी त्या गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करणार आहेत. ‘एसडी’ आणि ‘आरडी’ यांच्या सांगीतिक शैलीचा आढावा ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र आपल्या खास निवेदन शैलीत करून देणार आहेत. ज्येष्ठ संगीतकार आणि ‘जिंगल’कार अशोक पत्की या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
’ कधी- शुक्रवार १३ मे २०१६
’ कुठे- पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाटय़ मंदिराचे प्रांगण, प्रभादेवी.
’ केव्हा-रात्री आठ वाजता
संकलन : शेखर जोशी
रघुनंदन पणशीकर यांचा ‘उदयस्वर’
शास्त्रीय संगीतातील विविध राग आणि त्याचा मानवी मनावर होणारा मानसिक व शारीरिक परिणाम यावर अभ्यास व संशोधन सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणामही समोर येत आहेत. आता विविध रोगांवरही हळूहळू का होईना औषधांबरोबरच पूरक उपचार पद्धती म्हणून ‘संगीतोपचार’ केले जात आहेत. शास्त्रीय संगीतातील विविध राग गाण्याची विशिष्ट वेळ आहे. त्याचा एक वेगळाच परिणाम आपल्या मनावर होतो. सकाळच्या प्रसन्न आणि शांत वेळेत कानावर पडणारे हे स्वर मनाला वेगळाच आनंद देतात. ‘पंचमनिषाद’ संस्थेतर्फे रवींद्र नाटय़ मंदिराच्या प्रांगणात दर महिन्याला होणाऱ्या ‘प्रात:स्वर’ या संगीत मैफलीला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. पश्चिम उपनगरातील रसिकांनाही सकाळच्या रागांच्या मैफलीचा आनंद घेता यावा यासाठी ‘पंचमनिषाद’च्या शशी व्यास यांनी जुहू येथील पृथ्वी थिएटर येथे ‘उदयस्वर’ ही मैफल सुरू केली असून दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. ‘उदयस्वर’चे सातवे पुष्प जयपूर अत्रोली घराण्याचे गायक रघुनंदन पणशीकर गुंफणार आहेत. भरत कामत (तबला) आणि निरंजन लेले (संवादिनी) त्यांना संगीतसाथ करणार आहेत.
’ कधी- रविवार, १५ मे २०१६
’ कुठे- पृथ्वी थिएटर्स, जुहू
’ केव्हा-सकाळी ७.३० वाजता
पं. सुरेश तळवलकर यांचा सत्कार
कोणत्याही संगीत मैफलीत गायकांसोबतच त्यांना संगीतसाथ करणाऱ्या तालवाद्य कलाकारांचेही योगदान तेवढेच महत्त्वाचे असते. तालवाद्यांमध्ये ‘तबला’ या वाद्यप्रकारात ‘तालयोगी’ पं. सुरेश तळवलकर यांनी आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन ‘आनंदमार्ग’ संस्थेच्या सांस्कृतिक शाखेतर्फे (रावा) त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आनंदमूर्ती ऊर्फ प्रभात रंजन सरकार यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त संस्थेतर्फे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तळवलकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आनंदमार्ग शिशू सदन यांनी सादर केलेले विशेष नृत्य, डॉ. मनीषा कुलकर्णी आणि अन्य गायकांनी सादर केलेले ‘प्रभात संगीत’, प्रभात संगीतावर आधारित ‘नृत्यालिका’ यांनी सादर केलेली ‘प्रणाम तुम्हे सदाशिव’ ही नृत्यनाटिका आदी कार्यक्रमही या वेळी सादर होणार आहेत.
नृत्यनाटिकेचे लेखन आणि नृत्य दिग्दर्शन अनुक्रमे आचार्य हरात्मानंद व डॉ. किशुपाल यांनी केले आहे.
’ कधी- शनिवार १४ मे २०१६
’ कुठे- पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाटय़ मंदिर प्रांगण, प्रभादेवी. ’ केव्हा- सायंकाळी सात वाजता.
‘वास्तुपुरुष’ पाहण्याची संधी
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी मराठी चित्रपटात विषय, आशय आणि सादरीकरण पद्धतीत अनेक नवीन प्रयोग केले आहेत. ‘दोघी’, ‘देवराई’, ‘वास्तुपुरुष’, ‘दहावी फ’ हे त्यांचे गाजलेले काही चित्रपट. सामाजिक आणि गंभीर विषय त्यांनी विविध चित्रपटांतून सहजपणे हाताळले. ‘वास्तुपुरुष’ या चित्रपटात त्यांनी कर्मठ कुटुंबात वाढलेल्या डॉक्टरची कथा सादर केली आहे. महाराष्ट्र सेवा संघ-मुलुंडच्या ऐरोली शाखेचा कला विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘वास्तुपुरुष’ हा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर, उत्तरा बावकर, सिद्धार्थ दप्तरदार, महेश एलकुंचवार, अतुल कुलकर्णी, तुषार दळवी, रवींद्र मंकणी हे कलाकार आहेत. चित्रपटानंतर प्रभात चित्र मंडळाच्या सदस्यांसोबत चित्रपटावर चर्चा करता येणार आहे.
’ कधी- शनिवार १४ मे २०१६
’ कुठे- महाराष्ट्र सेवा संघ, ऐराली शाखा, म. बा. देवधर संकुल, सेक्टर-१७, ऐराली, नवी मुंबई<br />’ केव्हा- सायंकाळी ६.३० वाजता
भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान यांचे चरित्र शिल्परूपात
‘रामायण’ आणि ‘महाभारत’मधील पौराणिक कथांचे आणि पात्रांचे आबालवृद्धांना नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून सादर झालेल्या या मालिकाही अमाप लोकप्रिय झाल्या होत्या. भारतीय पौराणिक कथांमध्येही ‘भगवान श्रीकृष्ण’ आणि ‘हनुमान’ यांच्या गोष्टी लहान मुलांच्या अधिक आवडीच्या आहेत. त्यांचे चरित्र आणि जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी शिल्पकृतींच्या माध्यमातून जिवंत करण्याचे आव्हान शिल्पकार प्रदीप शिंदे यांनी पेललेले आहे. ‘बाल गणेश’, ‘बालकृष्ण’ यासह सूर्याला फळ समजून त्याच्याकडे झेपावणारा हनुमान, ‘लंकादहन’ करणारा हनुमान, द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणारा हनुमान आहे तसेच गोवर्धन पर्वत उचलणारा, कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण अशी शिल्पे शिंदे यांनी तयार केली आहेत. ही शिल्पे त्यांनी पितळ, दगड व लाकडाच्या जमा केलेल्या वस्तूंपासून तयार केली आहेत. देवांच्या पितळी मूर्ती, पितळ्याची भांडी, दगडी पाटा व वरवंटा, स्टोव्हचा बर्नर, लाकूड याचाही वापर करण्यात आला आहे.
’ कधी- १६ मे २०१६ पर्यंत
’ कुठे- जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट
’ केव्हा- सकाळी ११ ते सायं. ७ वाजेपर्यंत
पुन्हा एकदा ‘किंग लिअर’
विल्यम शेक्सपिअर यांच्या नाटकाने जगभरातील लेखकांना आणि प्रेक्षकांनाही मोहिनी घातली आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांपैकी ‘किंग लिअर’ ही अजरामर नाटय़कृती. शेक्सपिअरच्या ४०० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘किंग लिअर’ ही नाटय़कृती पुन्हा एकदा रंगमंचावर सादर होणार आहे. कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ या नाटय़संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून विंदा करंदीकर यांनी नाटकाचा मराठी अनुवाद केला आहे. अभिनेते डॉ. शरद भुथाडिया या नाटकात ‘राजा लिअर’ची मुख्य भूमिका करत आहेत. शेक्सपिअर यांच्या चाहत्यांसाठी हे नाटक म्हणजे पर्वणी आहे.
’ कधी- शुक्रवार १३ मे २०१६
’ कुठे- शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम)
’ केव्हा- रात्री आठ वाजता
ऋतुराज वसंत
भगवान श्रीकृष्णाने वसंत ऋतूचे ‘ऋतुनाम कुसुमाकर’ अशा शब्दांत कौतुक केले आहे. संपूर्ण आसमंतात चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण करणारा वसंत ऋतू माणसाच्या मनावरचीही मरगळ आणि उदासीनता दूर करतो. माहीम सार्वजनिक वाचनालयाचा ३९ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वसंत ऋतूचे हेच विलोभनीय वर्णन उलगडले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या माजी प्रमुख डॉ. गौरी माहुलीकर ‘ऋतूनां कुसुमाकर: कृतुराज वसंत’ या कार्यक्रमात वसंत ऋतूचे काव्यमय आणि अलंकारिक रूपाचे दर्शन घडविणार आहेत. नेहा खरे व अनघा मोडक या वासंतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
’ कधी- १४ मे २०१६
’ कुठे- माहीम सार्वजनिक वाचनालय, बृहन्मुंबई महापालिका समाजकल्याण केंद्र, माहीम
’ केव्हा- सायंकाळी ५.३० वाजता
संकलन : शेखर जोशी