मुंबई मायानगरीचं आकर्षण प्रत्येकालाच आहे. याच मायानगरीचं भीषण वास्तव एका माहितीतून समोर आलंय. वाहनांची वाढलेली संख्या, दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी, भरीस भर म्हणून अनेक ठिकाणी सुरु असलेली रस्त्यांची, मेट्रोची कामं त्यामुळं मुंबईकर प्रवाशांची अक्षरशः कोंडी झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीनं प्रवासाच्या वेळेत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती Ridlr या अॅपच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

ऐन गर्दीच्या वेळी मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR), पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि तुलसी पाईप रोड (दादर ते लोअर परळ) या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळं प्रवासाच्या वेळेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत यावर्षी ऑगस्टमध्ये प्रवासी वेळेत वाढ झाल्याचं निरीक्षण या अॅपनं नोंदवलं आहे. ऐन गर्दीच्या म्हणजेच सकाळी ९ ते १० आणि संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत वाहनांचा वेग मंदावलेला आहे. वाहतूक कोंडीमुळं वाहनाचा वेग प्रतितास ५ किलोमीटरनं कमी झाला आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरून ‘सुसाट’ धावणाऱ्या वाहनांच्या वेगातही सरासरीनं घट झाली आहे. ऑगस्टमध्ये सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत वाहनांचा वेग २३ किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये हाच वेग सरासरी २७ किलोमीटर प्रतितास होता. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील वाहनांच्या वेगातही घट झाली आहे. ६० किलोमीटर प्रतितास असलेला वेग ५२ किलोमीटर प्रतितास झाला आहे. याशिवाय मुंबईतील इतर मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळं तेथील प्रवासाच्या वेळेतही कमालीची घट झालेली दिसून येत आहे. मेट्रो ७ (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व) आणि मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग) च्या कामांमुळं वाहतूक कोंडीचा सामना करत असल्याचा आरोप प्रवासी आणि वाहनचालक करत आहेत. याबाबत एमएमआरडीएचे प्रकल्प सहसंचालक दिलीप कवठकर म्हणाले, की “या मार्गांवरील वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आलं आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीनं हे वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. पावसाळ्यापर्यंत ही समस्या काही प्रमाणात आहे. पुढील वर्षी या रस्त्यांवरील वाहतूक सेवा सुरळीत होईल.” मेट्रोमुळं या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटकाच होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळं दररोज २.८ कोटी रुपयांचं इंधन वाया जात असल्याचा दावाही या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.