मुंबई : मुंबईतील अत्यंत लोकप्रिय खाद्यपदार्थ अशी ओळख असलेला वडापाव महागला असून एकेकाळी केवळ पाच रुपयांत मिळणारा वडापाव आता २५ ते ३० रुपयांना मिळू लागला आहे. त्यातच आता रेल्वे स्थानकात मिळणाऱ्या वडापावच्या किंमतीतही वाढ करण्यात आली असून आता प्रवाशांना वडापावसाठी १३ रुपयांऐवजी १८ रुपये मोजावे लागणार आहेत.
तसेच, हॉटडॉग, चायनीज भेळ, शेवपुरी आदी अन्य पदार्थ रेल्वे स्थानकात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र त्याच वेळी लिंबू आणि कोकम सरबताचे दर एक रुपयांनी कमी करण्यात आले असून आता लिंबू आणि कोकम सरबत सहाऐवजी पाच रुपयांना मिळणार आहे.
कमी पैशात भूक भागविण्यासाठी कष्टकरी, कामगारांसह अनेक जण वडापावला पसंती देतात. वडापाव मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. मुंबईतील नाक्यानाक्यावर सहज उपलब्ध होत असल्याने, तसेच खिशाला परवडत असल्याने अनेकजण पावपावला पसंती देतात. मात्र, वाढत्या महागाईची झळ वडापावलाही बसली आहे. वडापावच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, रेल्वे स्थानकात तुलनेने कमी किंमतीत वडापाव उपलब्ध होत होता.
त्यामुळे अनेक जण रेल्वे स्थानकात वडापाव घेत होते. मात्र, आता रेल्वे स्थानकांतील वडापावही महागल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पूर्वी १३ रुपयांना मिळणाऱ्या वडापावसाठी आता प्रवाशांना १८ रुपये मोजावे लागणार असून पश्चिम रेल्वे प्रशासनाने या सुधारित दराला मंजुरी दिली आहे. हे नवे दर १ जुलैपासून रेल्वे स्थानकांमध्ये लागू झाले आहेत. रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दर सहा महिन्यांनी रेल्वे स्थानकातील स्टॉल्सवर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतींचा आढावा घेऊन त्यात आवश्यक बदल करणे गरजेचे असते.
पश्चिम रेल्वेवरील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांच्या दरात २०२१ साली बदल करण्यात आले होते. वाढत्या महागाईमुळे अनेकदा स्टॉल्सचालकांकडून खाद्यपदार्थांचे दर वाढविण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार आता रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांचे दर वाढविण्यात आले आहेत. तसेच, लिंबू व कोकम सरबतचे दर सहा रुपयांवरून पाच रुपये करण्यात आले आहेत. मात्र, त्याची मात्रा कमी करण्यात आली असून २०० मिलीलिटरऐवजी ऐवजी आता १५० मिलिलिटर सरबत मिळणार आहे.
दरम्यान, आता रेल्वे स्थानकांमध्ये नवनवीन खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यात शेवपुरी, व्हेज हॉटडॉग, दाबेली, चायनीज भेळ, व्हेज पफ, व्हेज चिज टोस्ट सँडविच आदींचा समावेश आहे. दाबेली २० रुपये, चायनीज भेळ ३०, व्हेज हॉटडॉग ३५, व्हेज पफ ३५, शेवपुरी ४५ आणि व्हेज चिज टोस्ट सँडविच ५० रुपये या दरात विक्रीसाठी रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे.