मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारपासून ४ लोकल फेऱ्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे फेऱ्यांची संख्या एकूण १ हजार ४१० इतकी झाली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात पश्चिम रेल्वेवर आणखीन १० लोकल सेवांची भर पडणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

नुकताच कांदिवली ते बोरिवली दरम्यानचा ३.२१ किमी भागाचे काम वेगात पूर्ण झाले. त्यानंतर वेग चाचण्या घेऊन हा विभाग नियमित रेल्वे वाहतुकीसाठी सुरू केला. या नवीन मार्गिकेमुळे वांद्रे टर्मिनसवरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी दोन समर्पित मार्ग उपलब्ध झाले. मुख्य मार्गावरील लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या आणि लोकलसाठी स्वतंत्र मार्ग झाले. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढविण्यास आणि लोकलचा वक्तशीरपणा वाढवण्याचा मार्ग खुला झाला. पश्चिम रेल्वे प्रशासनाने त्यांच्या एकूण लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केली. चार अतिरिक्त सामान्य लोकल वाढविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या ही १ हजार ४०६ वरून १ हजार ४१० फेऱ्या होणार आहे.

प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्यासाठी १ फेब्रुवारी २०२६ पासून १२ डब्यांची ४ अतिरिक्त सामान्य लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. या अतिरिक्त सेवा सुरू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल फेऱ्यांची संख्यांच्या संख्येत आणखीन १० फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या १ हजार ४२० पर्यंत वाढण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी दिली.

नवीन चार लोकल सेवेपैकी दोन अप आणि दोन डाऊन मार्गावर चालवण्यात येत आहेत. या चारही लोकल धीम्या मार्गावर धावण्यास सुरुवात झाली. अप दिशेकडील लोकल सकाळी ११.३९ वाजता भाईंदरवरून वांद्रेपर्यंत धावण्यास सुरुवात झाली आहे. तसेच दुपारी १२.१४ वाजता भाईंदर- चर्चगेट, डाऊन दिशेकडील लोकल पहाटे ४.३० वाजता वांद्रे- भाईंदर, दुपारी १.२१ वाजता वांद्रे – भाईंदर लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे.

वातानुकूलित लोकलमध्ये वाढ केली जात असताना, सर्वसामान्य लोकल सेवा रद्द केल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास खोळंबा होत होता. अनेक प्रवाशांना जादा पैसे मोजून वातानुकूलित लोकलचे तिकीट काढावे लागत होते. परंतु, आता सामान्य लोकल फेऱ्या वाढणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील कांदिवली-बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी १८ डिसेंबर २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या ३० दिवसांचा ब्लॉक घेतला होता. या ब्लॉक कालावधीत नियोजित कामे करण्यात आली. वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यानची सहाव्या मार्गिकेची कामे टप्प्याटप्याने करण्यात आली. खार रोड ते गोरेगाव दरम्यानचे काम नोव्हेंबर २०२३ आणि गोरेगाव ते कांदिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम ऑक्टोबर २०२४ मध्ये करण्यात आले.