मुंबई : पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेवर तीन ठिकाणी झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे सोमवारी सकाळी सेवा विस्कळीत झाली. वसई रोड, दादर व गोरेगाव येथे पॉइंट बिघाड झाल्याने अनेक उपनगरी रेल्वेगाड्या ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

वसई रोड येथे पहाटे ४ वाजून ४६ मिनिटांनी बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेकडील जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या खोळंबून राहिल्या. दादर स्थानकात सकाळी १०.१० वाजता दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. गोरेगाव येथे सकाळी १०.२२ वाजता अप व डाऊन हार्बर मार्गावरील पॉइंटमध्ये बिघाड झाला.

दादरजवळ पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने जलद मार्गावरील अप उपनगरीय रेल्वेगाड्या माटुंगा व माहीम स्थानकांदरम्यान खोळंबून राहिल्या. काही उपनगरीय जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे जलद व धीम्या उपनगरीय रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या. जलद उपनगरीय गाड्या विरार ते चर्चगेट २७ मिनिटे व चर्चगेट ते विरार १९ मिनिटे उशिरा धावत होत्या. दरम्यान, पश्चिम रेल्वेने दुरुस्ती हाती घेऊन उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.