गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी होण्याची कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी देशाची राजधानी होऊ शकत नाही मुंबई हीच देशाची आर्थिक राजधानी राहिल, हे भाजपाच्या लोकांना कळले पाहिजे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

“मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले. गुजरातच्या आनंदीबेन आल्या होत्या. आता पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री आले आहेत. प्रत्येक लोक येतात परंतु कधी कटकारस्थान करुन महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे काम कुणी केले नाही,” असेही नवाब मलिक म्हणाले.

“सात वर्षात मोदी सरकार आल्यानंतर उद्योग व आस्थापना मुंबईमध्ये न होता गुजरातच्या गांधीनगरमध्ये कसे होतील. मोदीसाहेबांचे आदेश व देवेंद्र फडणवीस यांचा होकार यामुळे महाराष्ट्राचे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे जे लोक बोट दाखवत आहेत त्याबाबतीत त्यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा चिमटाही नवाब मलिक यांनी काढला. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. व्यापार उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या पहिली प्राथमिकता महाराष्ट्राला देत आहेत, हेही आवर्जून नवाब मलिक यांनी नमूद केले.

“भाजपाविरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षाना एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुढाकार घेतायत. काँग्रेसला सोबत घेऊन भाजप विरोधात पर्याय उभा करीत आहे. त्याची चिंता भाजपाला लागली असून आमच्यात कशी फूट पडेल, हे ते बघत आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या एनडीएकडे लक्ष द्यावं. गोव्यात सरकार राहील का नाही, याची चिंता करावी,” असं मलिक म्हणाले.

“शरद पवार हे एक चाणक्य आहेत. हे सगळ्याना माहिती आहे. देशात सर्व पक्षांची मोट बांधताना काँग्रेसला सोबत घेऊनच जाणार आहोत,” असंही मलिक यांनी सांगितलं.