मुंबई : लोकलमध्ये एका महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत झालेले मारहाण प्रकरण वसई रेल्वे पोलिसांनी पैसे घेऊन मिटविले. तक्रार केल्यास वारंवार न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील अशी मला भीती घातली, असा आरोप मारहाण झालेल्या कविता मेंढरकर यांनी केला आहे. दरम्यान रेल्वे पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
चर्चगेट – विरार लोकलमध्ये मंगळवार, १७ जून रोजी कविता मेंढकर (३१) या महिलेला ज्योती सिंग (२१) नावाच्या तरूणीने मारहाण केली होती. लोकलमध्ये चढण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला होता. यावेळी ज्योतीने कविताच्या डोक्यात मोबाइल मारला होता. त्यामुळे कविताचे डोके फुटले आणि ती रक्तबंबाळ झाली होती. या प्रकाराची चित्रफित शुक्रवारी समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानतंर हा प्रकार उघडकीस आला. एवढी मारहाण होऊनही पोलिसात तक्रार का दाखल केली नाही? असा सवाल कविता मेंढकरला केला असता तिने हा आरोप केला.
आम्हा दोघींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेव्हा मला काही सुचत नव्हते. मी जर तक्रार केली तर वारंवार न्यायालयात फेऱ्या माराव्या लागतील, वकिलाला पैसे द्यावे लागतील असे मला सांगण्यात आले, असे कविता म्हणाली. माझे मंगळसूत्र तुटले होते ते दुरूस्त करण्यासाठी पैसे मिळवून देतो असे त्यांनी सांगितले. त्यानतंर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ज्योतीकडून पैसे घेतले. मी खुप घाबरलेेले होते. त्यामुळे मी माझ्या घरी देखील हा प्रकार सांगितला नव्हता, असेही ती म्हणाली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार- रेल्वे पोलीस आयुक्त वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी हे आरोप फेटाळले.
घटनेच्या तीन दिवसानंतर कुणीही आरोप करेल तर त्याला अर्थ नाही असे ते म्हणाले. आम्ही दोघा महिलांचे जबाब घेतले होते. त्यांनी समंतीने तक्रार दाखल करायची नसल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ स्टेशन डायरी नोंद केली असे ते म्हणाले. तरी देखील या आरोपांची पडताळणी केली जाईल असे डांगे म्हणाले. रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्यांना या आरोपांबाबत विचारले असता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले.