मुंबई : वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड परिसरातील समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला वांद्रे पोलिसांनी वाचवले. नैराश्य आल्यामुळे तिने समुद्रात उडी मारली होती. या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एका ५३ वर्षीय महिलेने बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास अचानक वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड परिसरातील समुद्रात उडी मारली. त्यावेळी गस्तीवर असलेले साईनाथ देवडे यांनी ते पाहिले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी समुद्रात उडी मारली. पोहत जाऊन त्यांनी या महिलेला समुद्रातून बाहेर काढले. तिला उपचाराठी वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मानसिक नैराश्यातून तिने पाण्यात उडी मारली होती, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस कर्मचारी साईनाथ देवडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.अशा घटना टाळण्यासाठी आम्ही मागील काही महिन्यांपासून बॅण्ड स्टॅण्ड समुद्रकिनारी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दिवसा आणि रात्री ५ कर्मचाऱ्यांचे पथक समुद्रकिनारी गस्त घालत असते, अशी माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.