सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वागमिता सिंगने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिला तिच्या मैत्रिणीला आलेला एक अनुभव कथन केला आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईत भाडे तत्त्वावर घर शोधणं हे कामही मोठ्या जिकीरीचं असतं. अशात वागमिताने तिच्या मैत्रिणीला घर मिळालं पण त्या मालकिणीने अंकशास्त्रातील ७ अंक जुळत नाही म्हणून कसं नाकारलं हे व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे.
काय म्हटलंय वागमिता सिंगने?
भाई मुंबईत काय चाललंय? नॉनव्हेज खाता म्हणून फ्लॅट भाडे तत्त्वावर मिळणार नाही ऐकलं होतं. अविवाहित लोकांना फ्लॅट दिला जात नाही ऐकलं होतं. पण आता सगळ्या मर्यादा पार झाल्या आहेत असंच मला वाटतंय. माझी एक मैत्रीण मुंबईत घर शोधते आहे. तिने मला फोन केला आणि सांगितलं मला एक घर सापडलं आहे तिथल्या मालकिणीला भेटायचं आहे आपण जाऊ. मी म्हटलं चालेल मी येते. आम्ही दोघी त्या घर मालकिणीच्या घरी गेलो. ती घर मालकीण सुशिक्षित होती, तिचं राहणीमान एकदम उंची होतं. मात्र त्या महिलेने माझ्या मैत्रिणीला विचारलं की तुझा नंबर काय? माझ्या मैत्रिणीला वाटलं की सदर घर मालकीण तिला फोन नंबर विचारते आहे का? त्यावेळी ती म्हणाली अंकशास्त्राप्रमाणे तुझा नंबर काय? माझ्या मैत्रिणीला यातलं काहीही कळत नाही. तिने त्या महिलेलाच विचारलं की ते काय असतं? तेव्हा त्या महिलेने सांगितलं तुझ्या जन्मतारखेची बेरीज हा तुझा लकी नंबर असतो. माझ्या मैत्रिणीचा लकी नंबर म्हणजेच तिच्या जन्मतारखेची बेरीज ७ आली. ज्यावर या घर मालकिणीने तिला सांगितलं माझ्या घराचा नंबर ४ आहे. तुझा नंबर ७ आहे. त्यामुळे मी तुला फ्लॅट भाडे तत्त्वावर घर देऊ शकत नाही. माझ्या मैत्रिणीला निव्वळ तिचा लकी नंबर जुळत नाही म्हणून फ्लॅट नाकारण्यात आला. हा मेंटल इलनेस आहे. याला मी काय नाव देऊ? असं म्हणत वागमिताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येत आहेत?
सोशल मीडियावर या व्हिडीओवर प्रतिक्रिया येत आहेत. एक युजर म्हणतो ४ आणि ७ हे क्रमांक राहु केतूचे आहेत, त्या मालकीण बाईंनी एक चांगली महिला भाडेकरु घालवली. आणखी एका युजरने म्हटलं आहे ४/७ हे तर उत्तम काँबिनेशन आहे. उलट त्या महिलेला घर द्यायला हवं होतं. तिसरा युजर म्हणतो बरं झालं अशा मालकिणीच्या घरी राहयाला गेला नाहीत सुटलात. अशा विविध कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.
