लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमधील रेल्वे स्थानके, गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षित अशी वातानुकूलित प्रसाधनगृह उभारावी आणि त्यांच्या संचालनाची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटांवर सोपवावी, अशी मागणी भाजपच्या प्रवक्त्या प्रा. आरती पुगावकर – खुळे यांनी नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबईमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी म्हाडा आणि महानगरपालिकेने सार्वजनिक प्रसाधनगृहे बांधली आहेत. मात्र महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांचा अभाव असून महिलांची प्रचंड कुचंबणा होते. अनेक ठिकाणची सार्वजनिक प्रसाधनगृहे अस्वच्छ असून वीज आणि पाण्याचाही अभाव आहे. त्यामुळे नागरिक अशा प्रसाधनगृहांचा वापर करणे टाळतात. अशी प्रसाधनगृहे सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक बनली आहेत. रेल्वे स्थानके, तसेच प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नसून अस्वच्छ प्रसाधनगृहांमुळे महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशी खंत प्रा. आरती पुगावकर – खुळे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी, ‘स्वच्छ मुंबई’ या संकल्पनेलाच बाधा येत आहे, असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे.

महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन शहरातील सर्व सार्वजनिक प्रसाधनगृहांची तात्काळ व प्राधान्याने पाहणी करावी, विशेषत: रेल्वे स्थानके, गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ व सुरक्षित वातानुकूलित प्रसाधनगृह बांधावी, मोडकळीस आलेल्या प्रसाधनगृहांची दुरुस्ती करावी, सदर प्रसाधनगृहांच्या संचालनाची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटांवर सोपवावी, नियमित तपासणी आणि देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे.

प्रसाधनगृहांच्या संचालनाची जबाबदारी महिला बचत गटांकडे सोपविल्यास महिलांना रोजगार उपलब्ध होईल, तसेच स्वच्छता आणि जबाबदारीची भावना अधिक प्रभावीपणे जपली जाईल. हा विषय महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी प्रा. पुगावकर – खुळे यांनी पत्रात केली आहे.