मुंबई: मुंबईतील वाहतुक कोंडीत गाडी चालविणाऱ्या तीन चालकांपैकी एक चालक महिला आहे. मुंबईतील सुमारे ३३ लाख महिलांकडे परवाना आहे. २०१८-१९ मध्ये महिला चालकांची संख्या २७ टक्के होती. आता हीच संख्या सुमारे ४० टक्यांवर पोहोचली आहे. वडाळा, अंधेरी आणि बोरिवली आरटीओमधून १ एप्रिल १०२५ ते ३० मार्च १०२६ दरम्यान ८७ हजार ४७९ महिलांनी परवाना घेतला आहे.

महाविद्यालयात, बाजारात जाण्यासाठी,घर ते रेल्वे स्थानक प्रवास करण्यासाठी किंवा घरातील छोटी-छोटी कामे करण्यासाठी तरुणींचा-महिलांचा वाहन चालविण्याकडे कल वाढला आहे. त्यातच दुचाकी चालविण्याला महिलांची सर्वात जास्त पसंती आहे. मुंबईत सुमारे ५४ लाख वाहने नोंदणीकृत आहेत. यात १५ लाख चारचाकी, तर ३३ लाख दुचाकीची आहेत. मुंबईतील चार आरटीओ कार्यालयांमधून एप्रिल २५ ते मार्च २०२६ दरम्यान दोन लाख ३३ हजार १६१ नवी वाहन चालकांचे परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यात महिलांची संख्या सुमारे एक लाखाच्या घरात आहे.

तरुणींची संख्या जास्त

संगणकीकृत चाचणीसाठी सर्वाधिक महिला वाहन चालवण्यास शिकवणाऱ्या संस्थांमधून (ड्रायव्हिंग स्कूल) येतात. दररोज सुमारे ८०० ते १ हजार अर्ज परवान्यासाठी येतात. त्यात सुमारे २०० ते २५० अर्ज महिलांचे असतात. यात १८ ते २० वयोगटातील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. परवाना मिळवण्याच्या परीक्षेत नापास होण्याचे प्रमाण अवघे दोन ते पाच टक्के आहे. अंधेरी आणि बोरिवली आरटीओमधून परवाना घेणाऱ्या महिलांची संख्या तुलनेने अधिक आहे. विद्युत वाहनांना मिळणारे सरकारी प्रोत्साहन आणि अनुदानामुळे अनेक महिला ई-दुचाकीच्या खरेदीकडे वळत आहेत.

रिक्षा, मोठ्या मोटारी चालविण्यात महिलांना रस

महिला रिक्षा, छोट्या मोटारगाड्या चालविण्यापुरत्या मर्यादित नसून मुंबईच्या रस्त्यांवर आलिशान कार, एसयूव्ही आणि सेदान चालविताना दिसतात.

आरटीओनुसार महिलांना परवाना (एप्रिल २५ ते मार्च २६)

बोरिवली – ५८,८६०

अंधेरी – २०,५१७

वडाळा – ८१०२

स्वयंरोजगार म्हणून पाहावे

मुंबई आणि महानगरात सुमारे ८०० ते १ हजार महिला रिक्षाचालक आहेत. गेल्या काही वर्षांत महिलांचा वाहन चालविण्याकडे कल वाढला आहे. महिला रिक्षा चालकांची संख्या वाढविण्यासाठी राज्य सरकारदेखील प्रयत्न करीत आहेत. महिलांनी देखील स्वयंरोजगार म्हणून याकडे पहावे. -राजेंद्र देसाई, सरचिटणीस, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना

रस्त्यावरील प्रत्येक तीन चालकांमागे एक महिला असणे, ही केवळ संख्या नाही तर तो महिलांच्या वाढत्या आत्मविश्वासाचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा पुरावा आहे. आजची महिला केवळ प्रवासासाठीच नाही, तर स्वावलंबनासाठी वाहन चालवित आहे, ही आनंदाची बाब आहे. – विवेक पै,वाहतूकतज्ञ