मुंबई : लाकूड जाळून त्यावर चालणाऱ्या मोजक्या बेकऱ्या मुंबईत असल्या तरी त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता या बेकऱ्या बंद करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. लाकडावरील या बेकऱ्यांना इंधनाची पर्यायी व्यवस्था देता येईल का, त्याकरिता त्यांना काही मदत करता येईल का या दृष्टीने सध्या विचार सुरू आहे.

विजेवर चालणाऱ्या किंवा गॅसवर चालणाऱ्या बेकरीत रुपांतर करता येईल का, या दृष्टीने पर्यावरण विभाग सध्या अभ्यास करीत आहे. गेल्या वर्षी पालिकेने प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याकरिता कृती आराखडा तयार केला होता. त्यात शहरातील बांधकामाविषयी नियमावली समाविष्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर बेकरी उद्योग, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार, उपाहारगृहातील तंदूर भट्टीसाठी लाकूड जाळण्याऐवजी विजेचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – मुंबई : पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज संध्याकाळी जाहीर होणार

मात्र या सूचनांची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. बेकरी उद्योग हा १०० टक्के लाकूडविरहित व्हावा याकरिता पालिकेच्या पर्यावरण विभागाने आता आढावा घेण्यास व अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सुमारे ६५० बेकऱ्या असल्या तरी त्यापैकी २५ ते ३० बेकऱ्या या लाकडावर चालणाऱ्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘राहोवन’ वादानंतर IIT मुंबईची विद्यार्थ्यांवर कारवाई; सव्वा लाखांचा दंड, हॉस्टेलमधून निलंबन, संस्था संचालक म्हणतात…

प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचा विचार

लाकडावर चालणाऱ्या बेकरींना स्वस्तात लाकूड मिळत असते. त्यामुळे त्यांना विजेवर किंवा गॅसवर भट्टी चालवणे परवडेल का, मग त्यांच्याकरिता काही आर्थिक योजना आणता येतील का, या सगळ्याचा विचार सुरू आहे. – मिनेश पिंपळे, उपायुक्त, पर्यावरण विभाग