मुंबई : वरळी नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महापालिका आता वरळीमध्ये एक नवीन पूल बांधत आहे. या पुलामुळे वरळीतील डॉ. ॲनी बेझंट मार्ग आणि ई मोजेस मार्ग हे दोन प्रमुख मार्ग जोडले जाणार आहेत. एक नवीनच रस्ता तयार झाल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. तसेच वेळही वाचणार आहे.

वरळी नाका हे दक्षिण मध्य मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. चार रस्ते या ठिकाणी येऊन मिळतात. लोअर परळ स्थानक, फिनिक्स पॅलेडियम मॉल, पेडर रोड, सागरी किनारा मार्ग आणि प्रभादेवीकडे जाणाऱ्या वाहनांनाही याच नाक्यावरून जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यातच वरळीतील डॉ. ॲनी बेझंट मार्ग आणि ई मोजेस मार्ग हे दोन प्रमुख मार्ग एकमेकांना लगत आहेत. हे दोन्ही मार्ग वरळी नाक्याला एकत्र मिळतात. मात्र एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर जाण्यासाठी वरळी नाक्यापर्यंत येऊन वळसा घेऊन जावे लागते. त्यामुळे वाहतुकीचा वेळ वाढतो आणि वरळी नाक्यावरील वाहतूक कोंडीत भर पडते.

उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने हे दोन मार्ग जोडण्यासाठी एक छोटा पूल उभारण्याचे ठरवले आहे. या पुलाचे काम सुरू झाले आहे. नेहरू विज्ञान केंद्र येथील नाल्यावर हा नवीन पूल उभारण्यात येत असून तो थेट नेहरू तारांगणजवळ ॲनी बेझंट मार्ग येथे उतरणार आहे. त्यामुळे हे दोन मार्ग जोडले जाणार असून वाहतुकीचा एक नवीनच पर्याय (मिसिंग लिंक) उपलब्ध होणार आहे. पालिकेने २०२२ मध्ये या पुलाच्या बांधकामाचा आराखडा मंजूर केला. ऑक्टोबर २०२२ मध्ये कंत्राट देण्यात आले आणि नोव्हेंबर २०२२ पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. या पुलाचे काम फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.हा पूल पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वरळी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

नेहरू सेंटर आणि नेहरू तारांगण जोडणार

वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगण ही दोन ठिकाणे जवळजवळ दिसत असली तरी या दोन ठिकाणी जाण्यासाठी किमान दोन किमीचा वळसा घालून जावे लागते. हा पूल झाल्यास ही दोन ठिकाणे रस्तेमार्गाने एकमेकांच्या जवळ येतील.

सागरी किनारा मार्गावरही जाता येईल

हा पूल तयार झाल्यानंतर वरळीतील केवळ हे दोन मार्ग जोडले जातील एवढेच नाही, तर या पुलामुळे सागरी किनारा मार्गावर येणे आणि जाणेही सोपे होणार आहे. हा पूल पूर्णतः नाल्यावर असल्यामुळे त्याच्या बांधकामाचा खर्च जास्त आहे. – अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

असा असेल पूल

लांबी: ५७१ मीटर

रुंदी: १८.३ मीटर

अंदाजित खर्च: २८५ कोटी