मुंबई : रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील चन्नाट गावातील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असताना अंदाज चुकल्यामुळे मुंबईतील ऋषी पथिपकाचा (२२) पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळी घडलेली ही सहावी मृत्यूची घटना आहे.
मुंबईतील जोगेश्वरीमध्ये वास्तव्यास असलेला ऋषी सोमवार, ३० जून रोजी मित्रांसोबत रायगड किल्ल्यावर जात होता. किल्ल्यावर जाताना वाटेत चन्नाट गावातील धबधबा दिसला. त्यामुळे ते सर्वजण तेथे थांबले आणि धबधब्यामध्ये भिजण्यासाठी गेले. सायंकाळच्या सुमारास धबधब्यातील प्रवाहात ऋषी वाहून गेला.
त्याच्या मित्रांनी घटनेची माहिती माणगाव पोलिसांना दिली. त्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. मंगळवार, १ जुलै रोजी ऋषीचा मृतदेह सापडला. कोलाड आणि माणगाव येथील बचाव पथकाने ऋषीचा मृतदेह बाहेर काढला. एसव्हीआरएसएस कोलाड रेस्क्यू टीम, शेलार मामा रेस्क्यू टीम (भिरा पाटणूस), माणगावमधील वन्यजीव अभ्यासक, पोलीस प्रशासन आणि चन्नाट ग्रामस्थ यांच्या समन्वयाने शोध मोहीम राबविण्यात आली. मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते, असे स्वयंसेवकांनी सांगितले.
पावसाळ्यात नदी, नाले, धबधबे धोकादायक बनत असून अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यंदा पावसाळ्यात आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात तरुण पर्यटनासाठी जातात. धबधबे, नदीमध्ये डुंबतात. मात्र निसर्गाचे भान ठेवून, हवामान आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. केवळ रील्ससाठी जीव धोक्यात घालणे, डोहांमध्ये उड्या मारणे प्राणघातक ठरत आहे. – शंतनु कुवेसकर, वन्यजीव अभ्यासक
कायकाळजी घ्यावी
- स्थानिक मार्गदर्शक किंवा ग्रामस्थांचा सल्ला घ्या.
- धोक्याची सूचना असलेले फलक वाचा आणि त्याचे पालन करा.
- हवामान विभागाचा अंदाज, इशारा तपासा.
- समाज माध्यमांसाठी रील्स / फोटोशूट करताना स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.
- शक्य असल्यास, अधिकृत ट्रेकिंग/टूर गाइडसोबतच प्रवास करा.
काय टाळावे
- अनोळखी ठिकाणी पाण्याच्या कुंडात उतरू नये.
- उंच धबधब्यांच्या कड्यावर उभे राहणे किंवा उड्या मारणे टाळावे.
- प्रशासनाच्या आदेशांच उल्लंघन करू नये.