मोठी कारवाई! मुंबईत युट्यूबरला अटक, ५० लाखांचा गांजा जप्त; बॉलिवूडपर्यंत धागेदोरे असल्याचा संशय

मुंबई पोलिसांनी एका युट्यूब चॅनेलच्या दिग्दर्शकाला अटक केली आहे

मुंबई पोलिसांनी एका युट्यूब चॅनेलच्या दिग्दर्शकाला अटक केली आहे. त्याच्याकडे तब्बल एक किलो गांजा (मनाली चरस) सापडला असून त्याची एकूण किंमत ५० लाख इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई क्राइम ब्रांचच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ४३ वर्षीय गौतम दत्ताला अटक केली. अंधेरीमध्ये ही अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

गौतम दत्ता जुहू-वर्सोवा लिंक रोडवर वास्तव्यास असून एक युट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनेलचा दिग्दर्शकही तोच आहे. त्याचे बॉलिवूडशी संबंध असून अनेकांना अंमली पदार्थ पुरवत असल्याचा संशय असल्याचं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी (अंमलीपदार्थ विरोधी पथक) दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जुहू-वर्सोवा लिंक रोडवर गस्त घातली जात असताना संशय आल्याने गौतम दत्ताला अटक करण्यात आली.

गौतम दत्ताची तपासणी केली असता यावेळी त्याच्याकडे ५० लाख किंमतीचा एक किलो गांजा सापडल्याची माहिती दत्ता नलवडे यांनी दिली आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai youtuber arrested with cannabis worth 50 lakh sgy