मुंबई : मुंबईत २०२५ मध्ये रेबीजमुळे एकही मृत्यू झालेला नाही. शहराला २०२७ पर्यंत रेबीज नियंत्रित क्षेत्र बनविणे, तसेच २०३० पर्यंत ‘रेबीजमुळे शून्य मृत्यू’चे ध्येय गाठण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईत रेबीज निर्मूलन मोहीमे अंतर्गत पशुवैद्यकीय आरोग्य खात्याने घेतलेल्या विशेष प्रयत्नांचे महापौर रितू तावडे यांनी कौतुक केले. मुंबईतील प्रत्येक प्रभागात पुरेशा आणि विशेष प्रशिक्षित मनुष्यबळासह स्वतंत्र रेबीज क्लिनिक स्थापन करण्याचा महापौर रितू तावडे यांचा मानस आहे. मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पांतर्गत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते सोमवारी दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. जागतिक रेबीज दिनानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात कार्यक्रमात महापौर रितू तावडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी तावडे बोलत होत्या. प्रत्येक प्रभागनिहाय क्लिनिक अंतर्गत रेबीज प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक लसीकरणाची सेवा २४ तास उपलब्ध राहील, याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले. तसेच, प्रत्येक प्रभागात रेबीज क्लिनिक स्थापन करण्याचा मानस असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबईत कुठेही श्वानदंशाची घटना घडल्यास तत्काळ आणि सर्वोत्तम उपचार याठिकाणी मिळतील.
मुंबईतील प्रत्येक प्रभागांत अद्ययावत पशुवैद्यकीय उपचारासाठी श्वान पकडणारे स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. देशभरातील महत्त्वाच्या शहरात रेबीज निर्मूलन मोहीमेअंतर्गत मुंबईने मागील काही वर्षांत अतिशय उत्तम कामगिरी केली असून त्याचा कृती आराखडा अंमलात आणण्यात मुंबईची कामगिरी अग्रस्थानी आहे. वर्ष २०३० चे उद्दिष्ट गाठण्यासाठी रेबीज निर्मूलन मोहिमेच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसंचालक डॉ. अजित शेवाळे यांनी दिले. प्राणी – मनुष्य यांच्यातील कलह शहरासोबतच प्रत्येक घरोघरी पोहचला आहे. मुंबईत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रेबीज प्रतिबंधक लस आणि सीरम उपलब्ध करून देण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा – लवंगारे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले.
प्रतिवर्ष सरासरी ५५ ते ६० हजार श्वान लसीकरणाचे लक्ष्य मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प- दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवणे, निरीक्षण आणि श्र्वानदंश प्रकरणे वेळीच शोधून काढणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. श्वान संख्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आगामी तीन वर्षासाठी प्रतिवर्ष सरासरी ५५ हजार ते ६० हजार श्वान लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, नियमितपणे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहीमेअंतर्गत जनजागृतीच्या अनुषंगाने ५ लाख विद्यार्थी आणि ५ हजार शिक्षकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
