मुंबईकरांसाठी सायकल सेवा

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

 

|| प्रसाद रावकर

प्रवासासाठी एक लाख सायकली उपलब्ध करून देणार;  पेडल तसेच इलेक्ट्रिक सायकलींचा पर्याय

मुंबई : जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे वाढणारे प्रदूषण आणि नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या यातना लक्षात घेऊन पालिकेने मुंबईत सार्वजनिक दुचाकी (सायकल) सामायिकीकरण यंत्रणा (पीबीएस) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी जवळपास जाण्याकरिता एक लाख

सायकली उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे मुंबईची पर्यावरणस्नेही शहराच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर मोठय़ा संख्येने नागरिक कामानिमित्त आपल्या वाहनाने मुंबईत येत असतात. त्यामुळे दिवसभर मुंबईत मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. परिणामी, अनेक भागांत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचबरोबर वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषणात भर पडत असते. ही बाब लक्षात घेत पालिकेने मुंबईत सार्वजनिक सायकल सामायिकीकरण यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक दुचाकी सामायिकीकरण     यंत्रणा राबविण्यासाठी काही कंपन्यांची नेमणूक करण्याचा पालिकेचा विचार आहे. या योजनेसाठी दुचाकी क्षेत्र निश्चित करण्यात येणार असून जाहिरात प्रदर्शित करण्याबाबत स्वतंत्र कंत्राटे देऊन त्याद्वारे महसूल उभा करण्याचा पालिकेचा मानस आहे.

या यंत्रणेद्वारे नागरिकांना पेडल तसेच बॅटरीवर चालणाऱ्या सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या वर्षी दुचाकी उभ्या करण्याकरिता भाडे अथवा शुल्क घेण्यात येणार नाही. मात्र दुसऱ्या वर्षांपासून भाडय़ाची आकारणी करण्याचा पालिकेचा विचार आहे. ही यंत्रणा राबविणाऱ्या कंपनीला मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुरू करावे लागणार आहे.

त्याच्या आधारे दुचाकीची इत्थंभूत माहिती उपलब्ध करता येऊ शकेल. या यंत्रणेचा वापर करताना दुचाकीस्वारांना विमा संरक्षण देण्याची जबाबदारी ही योजना राबविणाऱ्या कंपनीवर सोपविण्यात येणार आहे. तसेच कंपनीला दुचाकींची नियमित देखभालही करावी लागणार आहे. नेमणूक केलेल्या कंपनीला ही यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी पालिकेकडून कोणताही आर्थिक भार उचलण्यात येणार नाही.

सभागृहाच्या मंजुरीची प्रतीक्षा

सार्वजनिक दुचाकी सामायिकीकरण यंत्रणेबाबत पालिका प्रशासनाने एक धोरण आखले असून हे धोरण पालिका सभागृहाच्या पटलावर सादर केले आहे. सभागृहाकडून अद्यापही या धोरणाला मंजुरी मिळालेली नाही. सभागृहाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर ही यंत्रणा कार्यान्वित करता येईल. मुंबईकरांनी मोठय़ा प्रमाणावर सायकलचा वापर सुरू केल्यास त्यांना व्यायाम घडेल आणि वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

आयुक्तांचा आदर्श

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रवीणसिंह परदेशी कटाक्षाने पहाटेच्या सुमारास विविध विभागांची पाहणी करीत आहेत. संबंधित विभाग कार्यालयात आपली मोटरगाडी उभी करून आसपासच्या परिसरात सायकलवरून फेरफटका मारताना आयुक्त नागरिकांच्या समस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी नागरी कामांची पाहणी करीत, तर वेळप्रसंगी सफाई कामगारांशी संवाद साधत आयुक्तांची सायकल सफर सुरू असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbaikar cycle service akp

ताज्या बातम्या