मुंबई : गेली अनेक वर्षे नित्यनियमाने भल्या पहाटे मुंबईमधील रस्ते स्वच्छा करणाऱ्या सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली २३ मार्च रोजी सफाई कामगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या मागणीसाठी सफाई कामगार मोठ्या संख्येने मलबार हिल येथील ‘वर्षा’ निवासस्थानी धडकणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्याचा शासन निर्णय २००८ मध्ये जारी करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेत आजघडीला २९ हजार ६१८ सफाई कामगार आहेत. मात्र आजतागायत केवळ ५० सफाई कामगारांना मालकीच्या हक्काचे घर देण्यात आले आहे. दरम्यानच्या काळाता बाबू गेनू मंडईची इमारत कोसळली आणि त्यात ६९ कामगारांचा बळी गेला. मुंबईत सफाई कामगारांसाठी ४६ सेवा निवासस्थाने असून यापैकी बहुतांश इमारती धोकादायक बनल्या आहेत. महापालिका प्रशासनाने या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला. मात्र करोना काळात त्याला खिळ बसली. आजघडीला केवळ ५,५९६ कामगारांना निरनिराळ्या वसाहतींमध्ये सेवा निवासस्थान देण्यात आले आहे.
सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी प्रशासन पातळीवर अनेक वेळा चर्चा करण्यात आली. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घराकडे लक्ष वेधण्यासाठी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सफाई कामगारांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने २३ मार्च रोजी वर्षा निवासस्थानी यावे, असे आवाहन म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव आणि सरचिटणीस वामन कविस्कर यांनी केले आहे.
