गौरव मुठे 

मुंबई : ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’ अर्थात ‘नरेडको’ने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे देशातील सर्वात मोठे स्थावर मालमत्ता प्रदर्शन ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२२’चे आयोजन केले आहे. येथील जिओ वल्र्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रथमच महाराष्ट्रातील अव्वल मालमत्ता विकासक आणि आघाडीच्या गृह वित्त कंपन्या एकाच छताखाली एकत्र येत आहेत. त्या निमित्ताने नरेडकोच्या महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष आणि रुणवाल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप रुणवाल यांच्याशी साधलेला संवाद

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या ‘होमेथॉन’ प्रदर्शनाबद्दल काय सांगाल?

करोनाकाळातील दोन वर्षांच्या खंडानंतर देशातील सर्वात मोठय़ा स्थावर मालमत्ता प्रदर्शन ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२२’चे या महिन्यात ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यामुळे घर खरेदीदारांना एकाच छताखाली शंभरहून अधिक विकासकांकडील १०,००० हून अधिक गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. एमएमआर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, रायगड, मीरा रोड, वसई आणि विरार याबरोबर पुणे, नाशिक आणि नागपूर येथील गृहप्रकल्पांची माहिती आणि खरेदीची संधी मिळेल. करोनाच्या दोन वर्षांच्या महासाथीनंतर, आता ग्राहकांना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील विकासकांना भेटून विविध गृहप्रकल्पांच्या पर्यायांची आणि मनाजोगत्या घराच्या खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येईल अशी संधी ‘होमेथॉन’च्या माध्यमातून मिळेल.

‘होमेथॉन’च्या माध्यमातून किती उलाढाल होणे अपेक्षित आहे?

‘होमेथॉन’मुळे गृहनिर्माण संबंधित संपूर्ण परिसंस्थेला चालना मिळणार आहे. कारण नरेडकोने फर्निचर क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयकियाला देखील यात समाविष्ट करून घेतले आहे. काही विकासक ग्राहकांना घराबरोबर फर्निचरदेखील देणार आहेत.  यामुळे आयकियाला देखील या तीन दिवसांच्या प्रदर्शनात १५ ते २० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना सवलतीच्या दरात गृहकर्ज मिळावे यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँका आणि गृहवित्त संस्थादेखील ‘होमेथॉन’मध्ये सहभागी होणार आहेत. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित संपूर्ण परिसंस्थेला चालना मिळेल. ‘होमेथॉन’च्या माध्यमातून गृहनिर्माण क्षेत्राला ३०० ते ५०० कोटी आणि संपूर्ण परिसंस्थेला ८०० कोटीपर्यंत उलाढाल होणे अपेक्षित आहे.

‘होमेथॉन’ची यंदाची वैशिष्टय़े काय सांगाल?

‘होमेथॉन’मध्ये संभाव्य गृहखरेदीदारांना, सणासुदीच्या विशेष ऑफर, घराची वाजवी किंमत, मुद्रांक-नोंदणी शुल्कात सवलत, वस्तू आणि सेवा करातून सूट, विशेष गृहकर्ज योजनांसारख्या विविध सवलतींचा लाभदेखील मिळेल. प्रत्येक विकासक आपल्या संभाव्य ग्राहकांसाठी विविध सवलती आणि घराच्या नोंदणीवर तात्काळ लाभदेखील देणार आहेत. तसेच ‘होमेथॉन’ सहभागींना आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्या संभाव्य घरखरेदीदारांना कार, फोन, सोने आणि इतर अनेक बक्षिसे सोडतीच्या माध्यमातून जिंकण्याची संधी मिळेल.

गृहखरेदीदारांचा प्रतिसाद कसा असेल?

‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२२’साठी ग्राहकांना ऑनलाइन नोंदणीचा पर्याय देण्यात आला आहे, त्या माध्यमातून लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तीन दिवस चालणाऱ्या ‘होमेथॉन’ प्रदर्शनाला ५० हजारांहून अधिक गृहखरेदीदार भेट देणे अपेक्षित आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील एक लाख चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे प्रदर्शन आयोजित केले असून गृहखरेदीदारांसाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांना प्रदर्शनस्थळी येण्यासाठी विनामूल्य वाहतूक सुविधा तसेच वाहनतळाची देखील सोय करण्यात आली आहे.

गृहकर्जाच्या वाढत्या दराची चिंता नको..

मध्यवर्ती बँकेकडून या वर्षांत मे महिन्यापासून आतापर्यंत तीन वेळा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्यात पुढेही आणखी वाढ शक्य आहे. मात्र त्याचा ग्राहकांच्या गृहखरेदीवर कोणताही परिणाम झालेला नाही, शिवाय तो होण्याची शक्यतादेखील कमी आहे. गृहकर्ज हे साधारणत: दीर्घ कालावधीचे म्हणजे किमान २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी घेतले जाते. यामुळे या दीर्घ कालावधीत कर्जाचे दर बदलत असल्याने सध्या जरी गृह कर्जाच्या दरात वाढ झाली असली तरी भविष्यात दर पुन्हा कमी होतील. कारण दर कमी-जास्त होण्याचे व्यावसायिक चक्र सुरूच असते. मात्र एकीकडे मे महिन्यापासून व्याजदर किंचित वाढले असले तरी दुसरीकडे घरांचे दरदेखील काही प्रमाणात कमी झाले आहेत तर काही ठिकाणी ते स्थिर आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.