Mumbai Dabbawala Service LPG Gas Shortage Impact: इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्यानंतर भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा भासत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक शहरांमधील हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. हॉटेलांसह अनेक ठिकाणी खानावळी आणि डबा देणाऱ्या किचनलाही बंद देवण्यात आले. याचा फटका १५० वर्षांपूर्वीच्या डबेवाल्यांच्या सेवेला बसला आहे.

पूर्वी रोज सकाळी मुंबईतील वांद्रे, दादर आणि चर्चगेट परिसरात पांढऱ्या कपड्यात, डोक्यावर गांधी टोपी चढवलेले अनेक डबेवाले दिसत असत. सायकलवर डबे अडकवून ते वेगाने रेल्वे स्थानक आणि तिथून पुढे ते कार्यालयात पोहोचवण्याची डबेवाल्याची धडपड दिसत असे. मात्र आता डबेवाल्यांची संख्या रोडावली आहे.

इंडिया टुडेने या संबंधीचे वृत्त दिले आहे. डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटले की, एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे जे ग्राहक पूर्णपणे खानावळ किंवा कम्युनिटी किचनवर अवलंबून होते, त्यांची डब्याची सेवा खंडीत झाली आहे. यामुळे अनेक जणांनी डबा बंद केला आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनचे सचिव किरण गावंडे यांनी सध्याच्या संकटाबद्दल भाष्य करताना म्हटले की, गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे आमच्या ग्राहकांच्या संख्येत कमालीची घसरण झाली आहे. पूर्वी आम्ही हजारो डबे रोज हाताळत होतो. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. याचा आमच्या उत्पन्नावर थेट आणि तात्काळ परिणाम होत आहे.

या संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले, “मागच्या १५० वर्षांपासून डबेवाल्यांची सेवा अविरत सुरू आहे. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे पहिल्यांदाच आमच्या सेवेवर परिणाम झाला आहे. अनेक खानावळी बंद झाल्यामुळे डब्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. जर हीच परिस्थिती पुढेही कायम राहिली तर आम्हाला रोजचा खर्च काढणेही अवघड होईल.”

डबेवाल्यांची सेवा घेणाऱ्या एका ग्राहकाने सांगितले की, मी तीन वर्षांपासून डबेवाल्यांची सेवा घेत आहे. पण जेव्हापासून खानावळी बंद झाल्या आहेत, तेव्हापासून आम्हालाच जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. यामुळे एका बाजूला आमचा खर्चही वाढला आहे.

तर दुसऱ्या बाजूला टिफीन सेवा देणाऱ्या खानावळीही गॅस टंचाईमुळे संकटात आल्या आहेत. यापूर्वी एका खानावळीतून रोज १०० ते १२५ लोकांचे जेवण बनविले जात असे, मात्र आता केवळ ४० माणसांचे जेवण बनविले जात आहे.